कुटुंबासाठी घ्या स्वत:च्या आरोग्याची काळजी

    दिनांक :21-Feb-2021
|
- गर्दीत वाढतोय् कोरोना
- घरी वाट बघतात मुले
नागपूर,
आजारी पडल्याशिवाय निरोगी आयुष्याची किंमत कळत नाही. आजार येईपर्यंत आरोग्यास महत्त्व दिले जात नाही. जगातील सर्व संपत्ती चांगले आरोग्य विकत घेऊ शकत नाही. ही वास्तविकता असतानाही आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. कोरोनामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाल्यानंतरही याविषयी कसे बिनधास्त आहेत. किमान कुटुंबासाठी तरी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या. कारण मुले घरी वाट बघतात. शहरात पुन्हा तीच स्थिती निर्माण होत असल्याने आज पुन्हा असे सांगण्याची वेळ आली आहे.

kothari _1  H x 
 
कोरोनाला एक वर्ष पूर्ण झाले. डिसेंबर २०२० नंतर बऱ्या पैकी नियंत्रण मिळविण्यात यश आले. अर्थात नागरिकांच्याच सहकार्याने हे यश मिळाले. त्यामुळे जानेवारी २०२१ पासून लोक बिनधास्त झाले. मुखाच्छादनाचा विसर पडला. बाजारपेठेत गर्दी वाढली. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले. नागपूरसह विदर्भात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे काही शहरात टाळेबंदी करण्यात आली. रुग्णसंख्या वाढत गेल्यास राज्यात टाळेबंदीचा इशारा देण्यात आला. तरी सुद्धा काहीच फरक पडलेला दिसून येत नाही. यात सामान्यच काय तर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मंडळी आघाडीवर आहेत. लोकांना आवाहन करायचे आणि स्वत: पुन्हा गर्दी करायची असे चित्र अलिकडे पाहावयास मिळते. यात नेमकी चूक कोणाची, असे विचारण्याची वेळ आली आहे. आयुष्यातील प्रत्येक क्षण जगण्याचा प्रयत्न करा, कारण गेलेले क्षण परत येणार नाहीत. आयुष्य खूप सुंदर आहे, ते अजून सुंदर बनविण्याचा प्रयत्न करा. संपत्तीचा बँक बॅलन्स नसला तरी चालेल पण आरोग्याचा बँक बॅलन्स असायला पाहिजे. हे सर्वांच्या मनात रुजेल तेव्हा कोरोनाच काय तर छोटे आजार होणार नाही.
 
आरोग्याविषयी कळते, पण वळत नाही
आरोग्याविषयी साऱ्यांनाच कळते पण वळत नाही, असे आता वाढत असलेल्या रुग्णसंख्येवरून दिसून येते. प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतल्यास कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल. सध्या कोविडचे रुग्ण वाढत आहेत. आता तरी लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे. शक्य असल्यास कार्यक्रम, समारंभांना टाळा. टाळता येत नसेल तर नियमांचे पालन करा, असे आवाहन आयएमएच्या अध्यक्षा डॉ. अर्चना कोठारी यांनी केले.