हॉट स्प्रिंग, गोगरा, डेपसांगमधून माघार घ्या

    दिनांक :21-Feb-2021
|
- चर्चेच्या दहाव्या फेरीत भारताने सुनावले
नवी दिल्ली,  
भारत-चीन यांच्यात लष्करी पातळीवरील चर्चेची दहावी फेरी पार पडली. तब्बल १६ तास झालेल्या या चर्चेत सैन्य माघारीच्या मुद्यावरून भारताने चीनला सुनावले आहे. या बैठकीत हॉट स्प्रिंग्ज, गोगरा, डेपसांग या पूर्व लडाख भागातून चिनी लष्कराने माघार घ्यावी, अशी मागणी भारताने रेटून धरली. दोन्ही देशांतील तणाव कमी करण्यासाठी या चर्चेचा लाभ होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनच्या हद्दीतील मोल्डो येथे ही बैठक शनिवारी झाली.मोल्डो येथे शनिवारी सकाळी १०.०० वाजता सुरू झालेली कमांडर पातळीवरील ही बैठक रविवारी पहाटे २.०० वाजेपर्यंत सुरू होती. तब्बल १६ तास चाललेल्या या बैठकीत हॉट स्प्रिंग्ज, गोगरा आणि डेपसांग येथून माघार घेण्याबाबत चर्चा झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
 
chaina _1  H x
 
तथापि, या बैठकीचा तपशील अधिकृत रीत्या जाहीर करण्यात आलेला नाही. पेंगाँग त्सोच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यावरून माघार घेण्याचा निर्णय झाल्यानंतर दोन्ही देशांत ही बैठक झाली आहे. हॉट स्प्रिंग्ज, गोगरा आणि डेपसांग या परिसरातून चिनी लष्कराने तातडीने माघार घ्यावी, असे भारताने चीनला ठामपणे सांगितले आहे.या चर्चेमध्ये तणाव कमी करण्याच्या मुद्यावर दोन्ही देशांनी भर दिला. या क्षेत्रातील तणाव कमी करण्यासाठी सर्वच संघर्ष बिंदूंवरून दोन्ही देशांनी तातडीने माघार घेणे आवश्यक असल्याचे भारताने चीनला सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
  
पेंगाँग त्सो भागातून दोन्ही लष्करांच्या माघारीबाबत चीनसोबत करार झाल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथसिंह  यांनी ११ फेब्रुवारी रोजी संसदेत दिली होती. या कराराप्रमाणे चीन पेंगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील फिगर-८ परिसरातून चीन माघार घेणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. गलवान खोऱ्यात भारतीय लष्करासोबत झालेल्या हिंसासाचारात चीनचे ४५ सैनिक मारले गेले होते. मात्र, यावर चीनने पहिल्यांदाच भाष्य करीत आपले पाच सैनिक मारले गेल्याची कबुली दिली.