आरोपींना निरपराध ठरविण्याचे षडयंत्र

    दिनांक :21-Feb-2021
|
-  डॉ. रिता विवेक सोनटके
पाण्याबाहेर मासोळी तडफडते आणि मरते. सूर्यप्रकाश मिळाला नाही तर झाडांची वाढही खुंटते, अनेकदा ती जगतही नाहीत. अशीच काहीशी अवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधकांची सध्या झाली आहे. जनतेने सत्तेचा ऑक्सिजन काढून घेतल्याबरोबर विरोधकांची शुद्ध हरपली आहे. असे शुद्ध हरपलेले विरोधक सध्या मोदींबाबत काहीबाही बोलत आहेत. बिनबुडाचे आरोप करत आहेत. मोदींना शिव्यांची लाखोली वाहात आहेत. मोदींवर होत असलेली टीका एकवेळ समजून घेता येईल. पण, देशाविरुद्धचे षडयंत्र कसे सहन करता येईल? लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला अस्थिर करण्याचे प्रयत्न देशातल्या विरोधी पक्षांनी केलेत, तर एकवेळ समजून घेता येईल. पण, देशच अस्थिर करण्याचे षडयंत्र देशातील काही सत्तांध-स्वार्थांध मंडळींच्या साथीने विदेशात रचले जात असेल तर ते कसे सहन करायचे? जे लोक प्रत्यक्ष राजकारणात नाहीत, त्यांच्याकडून सातत्याने मोदींचे सरकार अस्थिर करण्यासोबतच देशात अराजक माजवण्याचे प्रयत्न होताहेत आणि सत्तेबाहेर असलेली मंडळी सत्तेत येण्यासाठी त्यांना साथ देण्याचे पाप करताहेत, हे कुणीही राष्ट्रभक्त नागरिक सहन करणारच नाही.
 
 
red-fort.jpg_1  
 
स्वत: सत्तेत असताना इतरांना संविधानाचे धडे देणारे, संवेदनशीलतेचा परिचय द्या असे म्हणणारे, लोकशाहीचा गळा घोटणारे आज सत्तेबाहेर आहेत तर अस्वस्थ झाले आहेत. मोदींचे सरकार येण्यापूर्वी दहा वर्षे केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त परोगामी आघाडीचे सरकार सत्तेत होते. भाजपाने हे सरकार सहन केले. सरकारच्या धोरणांना भाजपाने विरोध केला नव्हता असे नाही. केला, पण देशाचे ऐक्य आणि अखंडता धोक्यात येईल, असे कुठलेही पाप भाजपाने केले नाही. इतरांच्या पापात भाजपाने सहभाग नोंदवला नाही. आता मोदींची सत्ता येऊन केवळ साडेसहा वर्षेच झाली आहेत. पण, सत्तेची चटक लागलेल्यांना ते सहनच होत नाहीये. देश तोडण्याची भाषा करणारांची साथ देताना त्यांना जराही संकोच वाटत नाही, यावरूनच त्यांची देशनिष्ठा लक्षात आली आहे.
 
 
एक-दोन नव्हे, अनेक कटकारस्थानं करूनही मोदी सरकार भक्कमपणे काम करते आहे, ही बाबसुद्धा असंतुष्टांची पोटदुखी ठरली आहे. सातत्याने प्रयत्न करूनही मोदींना धक्का लागत नाहीये, ही बाब त्यांना दिवसेंदिवस अस्वस्थ करते आहे. देशाच्या प्रजासत्ताक दिनी, 26 जानेवारी 2021 रोजी राजधानी दिल्लीत झालेला तमाशा, ऐतिहासिक लाल किल्ल्यावर झालेला नंगा नाच जगाने पाहिला. अराजक माजवण्याचा प्रयत्न पोलिसांच्या संयमाने, सत्ताधार्‍यांच्या राजकीय इच्छाशक्तीमुळे हाणून पाडला गेला. एकेक करून आरोपी पकडले जात आहेत. या आरोपींना वाचवण्याचे, त्यांची बाजू घेण्याचे निर्लज्ज प्रयत्नही सुरू आहेत. ते कसे निरपराध आहेत, हे सिद्ध करण्याची स्पर्धा लागली आहे. देशाच्या ऐक्याला धोका पोहोचविण्याचा प्रयत्न करणार्‍यांविरुद्धच्या कारवाईला लोकशाहीविरोधी म्हटले जात आहे. आरोपीच्या वयाचा दाखला दिला जात आहे. काय, चाललंय काय, हे जनतेने वेळीच ओळखले नाही, तर पुढला काळ कठीण आहे.
 
 
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यापासूनच देशातील काही मंडळींमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अनेकांचे अनेक बेकायदेशीर उद्योग बंद पडले आहेत. विदेशातून येणारा निधी थांबला आहे. मनमानीला चाप लागला आहे. पंतप्रधानांनी स्थिर पाण्यात एखादा दगड फेकला असता तर समजून घेता आले असते. पण, पंतप्रधानांनी तर संपूर्ण डोंगरकडाच पाण्यात ढकलला आहे. कम्युनिस्टांनी जो वैचारिक गोंधळ निर्माण केला होता, त्याला मोदींनी आवर घातला आहे. काँग्रेस आणि इतर गैरभाजपेतर पक्षांची सत्ता असताना देशात बौद्धिक विध्वंस करणारा मोठा वर्ग तयार झाला होता. तो फळफळत असतानाच, बहरत असतानाच अचानक मोदींना जनतेने कौल दिला आणि या लोकांच्या पायाखालची वाळूच सरकली. सत्तेत येताच मोदींनी यांचा हा धंदा बंद केला, त्यांची जहागिरी काढून घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनालेख अगदी स्वच्छ आहे. त्यांचे चारित्र्य स्वच्छ आहे. त्यांचे जीवन एक खुले पुस्तक आहे. आज ते देशाचे पंतप्रधान झाले, ते स्वत:च्या प्रतिमेमुळे, स्वत:च्या जीवन निष्ठेमुळे आणि निस्सीम देशभक्तीमुळे, अथक परिश्रमामुळे, त्यागी वृत्तीमुळे. त्यांच्या जडणघडणीत देश तोडणार्‍या मंडळींचा शून्य टक्केही वाटा नाही. सत्तेत येताच त्यांनी ठणकावले होते-‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा!’ ते त्यांनी करून दाखवल्यामुळेच अस्वस्थ झालेले दु:खात्मे मोदींसोबतच देशालाही त्रास देत आहेत. यांचा वेळीच बंदोबस्त झाला नाही, तर तुम्हा-आम्हाला प्रत्येकाला पापाचे परिणाम भोगावे लागतील, हे कायम लक्षात ठेवावे लागेल.
 
 
सत्तेची ऊब कमी झाल्यापासूनच अस्वस्थ झालेली मंडळी कोण आहेत, हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. संपूर्ण देशाला याची माहिती आहे. 2024 च्या निवडणुकीत याची प्रचिती येईलच. 2014 साली जे घडले ते अभूतपूर्व, अनपेक्षित असेच होते. 2017 साली उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत जो इतिहास घडला, तो ही मंडळी कधीच विसरणार नाहीत. भगवी लाट आली आणि आल्यानंतर या लाटेच्या प्रभावात अनेक जण वाहून गेले आहेत. अनेक जण अजूनही त्या भगव्या लाटेच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. उत्तरप्रदेशने दिलेल्या धक्क्यातून सावरायचेच असताना 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी या मंडळींच्या पेकाटात एवढी जोरात लाथ हाणली की, त्यामुळे झालेले दुखणे दूर करायला यांना अजूनही डॉक्टर सापडलेला नाही. उपचारासाठी ही मंडळी आंदोलनांचा आधार घेत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाने सर्व राजकीय पंडितांची भाकितं खोटी ठरवत 303 जागा जिंकल्या आणि त्यामुळे विरोधकांची पोटदुखी अजूनच वाढली. त्या पोटदुखीतूनच शाहीनबागचे आंदोलन उभे झाले, शेतकरी आंदोलनाचा वापर होतो आहे, हे सुज्ञ जनता उघड्या डोळ्यांनी पाहते आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी विरोधकांना जनतेच्या ताकदीचा, जनतेच्या समंजसपणाचा अनुभव येईलच. तोपर्यंत काय धिंगाणा घालायचा आणि स्वत:ची माती करवून घ्यायची, ती करून घ्यावी या लोकांनी!
 
 
मंदिर वहीं बनायेंगे, पर तारीख नहीं बतायेंगे, असा उपहास केला जायचा. प्रत्येक निवडणुकीत भाजपाकडून मंदिराचा मुद्दा उपस्थित केला जायचा, तेव्हा विरोधकांकडून अशी टिंगलटवाळी केली जायची. 2014 साली सत्तेत आल्यानंतर मोदींनी प्रथम बिघडलेली व्यवस्था दुरुस्त करण्याचे काम केले. स्वच्छ भारत अभियान राबविले. गरीब महिलांसाठी उज्ज्वला योजना आणली. एक कोटीपेक्षा जास्त महिलांना स्वयंपाकासाठी लागणार्‍या गॅसचे कनेक्शन मोफत दिले. प्रधानमंत्री आवास योजना आणली. ज्याचे घर नाही त्या प्रत्येकाला स्वत:चे घर घेता यावे यासाठी अडीच लाखांचे अनुदान देऊ केले. गावागावांत वीज पोहोचवली. जगात भारताची प्रतिष्ठा वाढवली. अनेक देशांना मित्र बनवले. अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेलाही भारताचे महत्त्व पटवून दिले. दहशतवाद पोसणार्‍या पाकिस्तानला एकटे पाडण्यात यश मिळवले. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. जगाला एक मजबूत संदेश दिला. परिणाम जो व्हायचा होता तोच झाला. 2019 सालच्या निवडणुकीत 2014 पेक्षाही मजबूत जनादेश मिळाला.
 
 
पंतप्रधान म्हणून मोदींची दुसरी कारकीर्द सुरू झाली. मोठमोठ्या निर्णयांचा एकामागोमाग धडाका सुरू झाला. तीन तलाकला तलाक देणारा कायदा करण्यात मोदी यशस्वी ठरले. ज्या 370 या कलमामुळे जम्मू-आणि काश्मीरमधील जनतेत वेगळेपणाची भावना होती, त्या 370 कलमाच्या मुळावरच घाव घातला. दहा पिढ्या खपल्या तरी 370 कलम रद्द करता येणार नाही, अशा वल्गना करणार्‍यांना जोरदार चपराक बसली. कालांतराने अयोध्येत मंदिर कधी उभारणार त्याची तारीखही निश्चित झाली. न्यायालयाचा निकाल मंदिराच्या बाजूने लागला आणि तारीख विचारणार्‍यांचे थोबाड पाहण्यासारखे झाले. एकामागोमाग एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले. अनपेक्षित असलेले प्रत्यक्षात आल्याने मोदीविरोधकांची बोबडीच वळली. 2024 च्या निवडणुकीतही आपला पराभवच होणार हे दिसू लागल्याने आतापासूनच मोदींना विरोध सुरू झाला. देश तुटला तरी चालेल पण मोदी नको, अशी भूमिका घेतलेल्या सत्तांध-स्वार्थांध लोकांना, राजकीय पक्षांना या देशातील हुशार मतदार जागा दाखवतील, याबाबत शंका असण्याचे कारण नाही. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात भारतात राहणार्‍या मुसलमानांच्या विरोधात काहीच नाही. त्यांच्या केसालाही धक्का लागण्याची शक्यता नाही. पण, जाणीवपूर्वक मुस्लिमांच्या मनात भीती निर्माण करण्याचे प्रयत्न झालेत, त्यातून शाहीनबागचे आंदोलन उभे करण्यात आले. देशात अराजक माजवण्याचा मोठा कट रचण्यात आला होता. पण, सरकारच्या सतर्क भूमिकेमुळे, संंयमामुळे ते कारस्थान फसले. तरीसुद्धा त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष असलेले ट्रम्प दिल्लीच्या दौर्‍यावर आले असताना दंगल भडकवण्यात आली. अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला. आता त्या दंगलीतले चेहरे समोर आले आहेत, एकेकाला अटक केली जात असताना मानवाधिकाराचा बागुलबुवा उभा केला जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे दाखले दिले जात आहेत.
 
 
शेतकर्‍यांना त्यांच्या हक्कासाठी आंदोलन करण्याचा अधिकार निश्चितपणे आहे. पण, दुर्दैवाने या शेतकर्‍यांचे आंदोलन तुकडे तुकडे गँगने हायजॅक केले. शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली मोठे कारस्थान रचण्यात आले. अगदी डिसेंबरपासूनच कारस्थानाची तयारी सुरू झाली होती. कारस्थान काय होते याचा पर्दाफाश 26 जानेवारीला झालाच. स्वत:ला पर्यावरणवादी कायकर्ती म्हणविणार्‍या ग्रेटा थनबर्गने चुकून टूलकिट ट्टिट केले नसते तर आजही नंगानाच सुरूच राहिला असता. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घातला गेल्याच्या बाता मारल्या गेल्या असत्या. टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दिशा रवीची तळी उचलून धरणार्‍यांची देशात कमी नाही. आता तिला अटक झाली तर तिच्या वयाचा दाखला दिला जात आहे. ती फक्त 21 वर्षांची आहे. तिला काय कळतं, असं म्हटलं जात आहे. तिने देशाविरुद्ध जो गुन्हा केला आहे, त्याचे गांभीर्य कुठेही चर्चिल्या जात नाही, हे दुर्दैवी होय. 21 वर्षांची आहे म्हणजे ती कायद्यानुसार सज्ञान आहे. केलेल्या गंभीर गुन्ह्यासाठी तिला शिक्षा तरी झालीच पाहिजे. तिची बाजू घेण्याचे कारण नाही. 21 वर्षे वय असताना तुम्ही लग्न करू शकता, आयएएस-आयपीएस बनू शकता, चांगली नोकरी मिळवू शकता, याचाच अर्थ तुमच्या बुद्धीचा पूर्ण विकास झाला असतो. मग, अपराध केला म्हणून अटक होताच दिशाच्या वयाच्या नावाने बोंबा ठोकण्याचे कारण काय? मातापिता आपल्या 21 वर्षे वयाच्या मुला-मुलीला देशसेवा करण्यासाठी लष्करात पाठवू शकतात. मग, 21 वर्षे वय असलेल्या आरोपीला अटक केली जाऊ शकत नाही, तिच्यावर खटला दाखल केला जाऊ शकत नाही? तिला अटक झाली म्हणून देशाची लोकशाही संकटात सापडते? काय, चाललंय काय? सुज्ञ नागरिकांनी गंभीरपणे विचार करायला हवा.
 
 
आपल्याला कल्पना नाही. फार मोठे कारस्थान रचण्यात आले आहे. उत्तरप्रदेशातून काँग्रेस तर गेल्या तीन दशकांपासून सत्तेबाहेर आहे. लोकसभेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत तर राहुल गांधीही अमेठीतून पराभूत झाले. इमानदारीने काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नकोसे झाले आहेत. ते कधी सत्तेतून जातात, याचीच सगळे जण वाट पाहताहेत. शिवाय, उत्तरप्रदेशात योगी डोईजड झाले आहेत. त्यांनी गुंडापुंडांना पळता भुई थोडी केली आहे. गृहमंत्री अमित शाह यांचा वचक एवढा आहे की, त्यामुळे अनेकांचे अनेक धंदे बंद झाले आहेत. बंगालमध्ये शाह यांनी ज्याप्रकारे भाजपासाठी वातावरण तयार केले आहे, ते पाहता अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मोदी-शाह-योगी हे त्रिकुट सत्तेबाहेर जाण्याची स्वप्ने अनेकांना पडताहेत. दिवसा स्वप्ने पाहिली जात आहेत. त्यामुळे या तिघांमध्ये फूट कशी पडेल, मोदींना सत्तेबाहेर कसे घालवता येईल आणि मोदींनंतर अमित शाह सत्तेत येणार नाहीत, यासाठी समीकरणं जुळवण्याचे केविलवाणे प्रयत्न सुरू आहेत. पण, या तिघांमध्ये मजबूत असे बॉण्डिंग आहे की, कुणी कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी मोदी-शाह हा फेव्हिकॉलचा जोड तुटणार नाही. काँग्रेसच्या सत्ताकाळात कारस्थानी मंडळींना भरपूर संधी मिळत होती. मोदींच्या राजवटीत त्याला आळा घातला गेला. काँग्रेसमध्ये इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची झोप त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांमुळे उडत असे. एखाद्या नेत्याने विशिष्ट उंची गाठली तर त्याचा बंदोबस्त कसा करायचा, यातच काँग्रेसच्या नेत्याचा वेळ खर्ची पडायचा. पण, भाजपात तसे नाही. मोदी आणि शाह या दोन नेत्यांमध्ये जबरदस्त ‘अंडरस्टॅण्डिंग’ आहे. त्यामुळे त्यांच्यात मतभेद निर्माण करण्याचा कुणी कितीही प्रयत्न केला तरी तो सफल होणार नाही, याची खात्री आहे. भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. एक चहावाला पंतप्रधान होऊ शकतो, नितीन गडकरींसारखा सामान्य कार्यकर्ताही पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो आणि प्रतापचंद्र सारंगी यांच्यासारखा साधू माणूस मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रीही होऊ शकतो, हे लक्षात घेतले तर भविष्यात काय वाढून ठेवले आहे, याची सहज कल्पना यावी.
 
-9422827547