भावनांचे उदात्तीकरण करणारी आनंददायी भाषा...

    दिनांक :21-Feb-2021
|
- आज जागतिक मातृभाषा दिन
 
नागपूर, 
भाषा आपल्या मूर्त आणि अमूर्त वारशाचे जतन आणि विकास करण्याचे सर्वांत शक्तिशाली साधन आहे. जगभरात शांतता, बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व मातृभाषांचे संरक्षण करण्यासाठी दरवर्षी 21 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करण्यात येतो.
 

Mother day_1  H 
 
21 फेब्रुवारी 1952 रोजी ढाका विद्यापीठाच्या विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी तत्कालीन पाकिस्तान सरकारच्या भाषा धोरणाला जोरदार विरोध केला होता. उर्दू भाषा लादणे व बांगला भाषेला विरोध असे ते धोरण होते. याविरुद्ध आंदोलन सुरू झाले. पाकिस्तानच्या पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर गोळीबारही केला. मात्र, विरोध अधिक वाढला आणि तत्कालीन पाक सरकारने बांगला भाषेला अधिकृत दर्जा दिला. या आंदोलनादरम्यान हुतात्मा झालेल्या युवकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने (युनेस्को) पहिल्यांदा म्हणजे 17 नोव्हेंबर 1999 रोजी हा दिवस मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. तत्पूर्वी, संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने 16 मे 2009 रोजी वापरात किंवा व्यवहारात असणार्‍या जगातील सर्व भाषांचे संरक्षण करण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी आपल्या सदस्य देशांना राजी केले. ठरावीक संकल्पनेत, बहुभाषिकता आणि बहुसंस्कृतीकरणाद्वारे विविधता आणि आंतरराष्ट्रीय समजूतदारपणा तसेच एकता वृद्धिंगत करण्यासाठी देखील हा दिवस साजरा करण्यात येतो.
 
 
आज आधुनिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरणामुळे जगभरात एकीकडे औद्योगिकीकरण, चंगळवाद तसेच भोगवाद वाढत असताना दुसरीकडे विविध संस्कृती, भाषा लुप्त होत आहेत. त्यामुळे त्यांचे संवर्धन व संरक्षण करणे काळाची गरज आहे. मातृभाषा हा सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय असतो. आपली भाषा ही आपली व आपल्या संस्कृतीची ओळख असते. केवळ ‘एक संपर्काचे माध्यम’ इतकाच भाषेचा उपयोग आणि तिची व्याप्ती नाही. मानवी भाषेला सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वैयक्तिक असे अनेक पदर आहेत आणि म्हणूनच ती मानवी जीवनाचे इतके महत्त्वाचे अंग आहे. आजूबाजूच्या जगातून मिळणार्‍या ज्ञानाला, सौंदर्याला, आनंदाला भरभरून प्रतिसाद देणारे एकमेव साधन म्हणजे मातृभाषा असते. म्हणूनच मातृभाषा भावनिक आनंदाचा विषय आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द देऊन भाषासमृद्धीचे व्रत घेतले होते. त्यातील अनेक शब्द आज पूर्णपणे मराठमोळे झाले आहेत.
 
 
भारतात एकूण बोलल्या जाणार्‍या भाषा 19 हजार 569 आहेत. (2011 च्या जनगणनेनुसार). भाषाशास्त्र बोली आणि भाषा असा फरक करत नाही. जी बोली बोलली जाते ती भाषाच असते. भारतात इतक्या भाषा बोलल्या जातात ही इतर देशांच्या तुलनेने डोळे दीपवणारी बाब आहे. अनेक लहान भाषा दिवसागणिक नामशेष होत आहेत. त्यामुळेच मातृभाषा दिनाचे महत्त्व अधिकच वाढते. दहा हजारांहून अधिक लोक एकच बोली बोलणारे आहेत. अशा भाषांची संख्या आज भारतात 121 इतकी आहे.