कौशल्य विकास

    दिनांक :21-Feb-2021
|
आज अनेक तरुण विविध विषयात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतात. पण हे सगळेच नोकरी किंवा उद्योगांना लागतात असे नाही. आपण आपली वसाहत, नातेवाईक, परिचित लोकांमध्ये पहा, अशी अनेक उदाहरणे सापडतील. भारतातील एका अत्यंत अवाढव्य व सुप्रतिष्ठित अशा कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकार्‍याने तर गेल्या वर्षी खळबळ उडवून दिली. ते म्हणाले की, आपल्याकडचे केवळ 10 टक्के पदवीधर नोकरी करण्यास समर्थ आहेत, 90 टक्के नाही. हे धक्कादायक आहे. हे तर झाले नवयुवकांबद्दल! पण, आज जे नोकरी/उद्योग करताहेत, त्यांच्यापैकी किती जण स्वतःच्या क्षमतांचा पूर्ण वापर आपल्या संस्थेसाठी करतात? अत्यंत मोजके लोक पगाराकडे न पाहता स्वतःला झोकून देतात. अधिकतम लोक ‘जितका पगार तितके काम’ या तत्त्वावर चालतात. शिवाय, काही लोक असेही असतात ज्यांचा मंत्र असतो, ‘काम इतकेच करा की तुमचा पगार जास्त वाटला पाहिजे’. यातील विनोद बाजूला ठेवला, तरी प्रत्येक संस्थेमध्ये या प्रकारचे लोक असतात. शिवदीपस्तंभ या मालिकेमध्ये या लोकांशी ‘कष्टाळू, कष्ट-टाळू आणि कसे-टाळू’ या नावांनी आपला परिचय झाला होता.
 
 
skill-development.jpg_1&n
 
मग या सर्व प्रश्नांना उत्तर आहे का? हो, निश्चितच आहे. पहिली गोष्ट म्हणजे आयुष्यात सातत्याने पुढे जाण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती. यासोबत ज्या इतर गुणांची आवश्यकता असते त्यातील दोन महत्त्वाचे गुण ‘जीवनध्येय आणि ज्ञान’ हे आपण मागील दोन लेखांमध्ये बघितले. आज त्या काडीमध्ये तिसरा महत्त्वाचा गुण आपण बघणार आहोत. तो म्हणजे कौशल्य विकास म्हणजेच स्किल डेव्हलपमेंट. आज जगात कुणीही, कुठलेही काम करो, त्याला त्या क्षेत्रातले कौशल्य अवगत करून घेणे आवश्यक असते. शेतात राबणारा साधा शेतकरी का असेना, पण त्याला जमीन कसणे, नांगर चालविणे, वखरणी, खुरपणी करणे, खत तयार करणे, उत्तम बियाणे निवडणे, पावसाचा अंदाज घेणे आदी अनेक कौशल्य आत्मसात करावी लागतात. शिक्षकांसाठी विषयावर अद्भुत पकड, आवाजात असामान्य धार, मुलांच्या पातळीवर येऊन शिकविण्याची क्षमता, केवळ पुस्तकी माहिती न देता अवांतर वाचनातून परिपक्व झालेले ज्ञान देणे, केवळ फळा-खडू घेऊन न शिकविता प्रत्यक्ष कार्यशाळेच्या माध्यमातून शिकविणे (अ‍ॅक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग) असे अनेक गुण आवश्यक असतात.
 
 
शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी असल्यास आपल्या विषयांच्या अभ्यासासोबतच उत्तम हस्ताक्षर, आत्मविश्वास, संवादकौशल्य, संभाषणकौशल्य अशा अनेक गुणांची आवश्यकता असते. तर एखाद्या गृहिणीसाठी घर उत्तम ठेवणे, स्वयंपाकात गती प्राप्त करणे, घरी काय हवे, काय नको यावर बारीक लक्ष ठेवणे, मुलांना उत्तम वेळ देऊन त्यांना योग्य संस्कार देणे अशा कौशल्यांची नितांत आवश्यकता असते. असे आपण ज्या ज्या क्षेत्राचा विचार करू, त्या सर्वच क्षेत्रात तिथे लागणारी कौशल्य आत्मसात करावी लागतात. हे न केल्यास आयुष्य तर सुरू राहते, पण यश मिळत नाही. पगार तर सुरू राहतो, पण जीवनातून मिळणारा आनंद संपून जातो. आपल्या क्षेत्रात कोणते गुण लागतात, हे ज्याचे त्याला माहिती असते. आपल्याकडे कोणते कौशल्य नाही हेसुद्धा प्रत्येकाला माहिती असते. पण तरी नसलेली कौशल्ये आत्मसात करता येतात, हे माहिती नसल्यामुळे अथवा मेहनत घेण्याची तयारी नसल्याने अनेक लोक यशस्वी ठरतात.
 
 
आपल्याला माहिती असेल की नव्वदच्या दशकात संगणक पहिल्याप्रथम भारतात आले. तेव्हा संगणक म्हणजे शंभर लोकांचे काम एका माणसाच्या साह्याने करणारे मशीन असाच त्याचा प्रसार झाला. त्यामुळे संगणक आले की, शंभरातील नव्याण्णव लोक बेरोजगार होतील, अशी धास्ती निर्माण झाल्याने संगणकीकरणाचा अनेक स्तरांतून विरोध झाला. ज्यांनी त्याच्याकडे पाठ फिरविली त्यांच्याकडे यशाने पाठ फिरविली. पण, त्या परिस्थितीमध्ये काही लोक संगणक शिकले. आज आपण विविध बँकांमध्ये अशा वयस्कर लोकांना आरामात संगणक हाताळताना पाहून चकित होतो. ही प्रवाहाविरुद्ध पोहणारी व जगासोबत चालणारी माणसे आहेत. कधी मोबाईलची सवयही नसलेले अनेक वयस्कर आज सहज फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅप वापरात आहेत, याला काय म्हणायचे. सोप्या भाषेत व रोजच्या जीवनातील हे कौशल्य विकासच आहे. काही लोक असे म्हणतात की, आता काय शिकायचे, हम तो बन चुके हैं. कुठे स्वतःला आयुष्यभर शिष्य म्हणवून घेणारे रामकृष्ण परमहंस आणि कुठे हे लोक. काही लोकांचा गोड गैरसमज असतो की, तिशी-पस्तिशीनंतर शिकणे बंद होऊन जात असते. तसे असते तर चाळीशीनंतर ज्याचा उजवा हात कटला तो तर उपाशी मारून जाईल. कारण तो आयुष्यभर उजव्या हाताने खात होता अन् चाळीशीनंतर शिकणे बंद होत असेल तर तो आता जेवणार तरी कसा? हे उदाहरण जितके हास्यास्पद आहे, तितकाच ‘शिकणे बंद होते’ हा युक्तिवाद हास्यास्पद आहे. हात कटलेला डाव्या हाताने जेवतच असतो, पाय कटलेला काठीच्या साह्याने, वाचा गेलेला इशार्‍याने, दृष्टी गेलेला स्पर्शाने जगणे शिकतच असतो. म्हणून पहिले ही गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की, कुठल्याही वयात कुठलीही गोष्ट शिकता येते असते, फक्त इच्छाशक्ती हवी.
 
 
मग महत्त्वाचा प्रश्न उरतो की, नवीन कौशल्य शिकावी कशी? यासाठी सर्वात पहिले आपल्या कार्यक्षेत्रात कोणती कौशल्ये लागतात, याची एक मोठी यादी बनवावी. यामध्ये काही गोष्टी तर सर्वांनाच लागतात. जसे ज्ञान, ध्येय, सकारात्मकता, शिस्त, प्रामाणिकपणा, लोकांसोबत काम करणे अशा साधारण चाळीस-पंचेचाळीस गोष्टी यात मोडतात. याशिवाय प्रत्येकाला त्याच्या क्षेत्राशी निगडित काही विशिष्ट गुण लागतात. आपण उपरोक्त उतार्‍यामध्ये पाहिले तसे शेतकरी, शिक्षक, विद्यार्थी, गृहिणी आदी सर्वांचे आपले विशेष गुण असतात. या सर्वांची एक प्रदीर्घ यादी तयार करावी. ही यादी साधारणपणे साठ-पासष्ठपर्यंत जाऊ शकते. एकदा यादी पूर्ण झाली की, आपल्याकडे कोणती कौशल्ये परिपूर्ण आहेत, त्या सर्वांना एक विशिष्ट खूण करावी. जे गुण थोड्या प्रमाणात आहेत आणि जरा मेहनत घेतली की ते पूर्णपणे आत्मसात करता येऊ शकतात, त्या सर्वांना दुसरी खूण करावी अन् शेवटी जे गुण आवश्यक तर आहेत; पण आपल्यात अजिबात नाही, त्यांना एक तिसर्‍या प्रकारची खूण करावी.
 
 
जे गुण आपल्यात आहेत ते आपले स्ट्रेंथ म्हणजे जमेची बाजू. जे कमी आहेत अथवा अजिबात नाही ते आपली विकनेस म्हणजे कमजोरी आहेत असे समजावे. जमेची बाजू नेहमी मजबूत राहील, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. त्यासोबतच थोडे कमी-जास्त असलेल्या कमजोरींना प्राधान्य देऊन समोर आणावे. त्या त्या विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून काही गोष्टी समजून घ्याव्या व एका वेळी एक विषय घेऊन त्यावर सातत्याने प्रयत्न करावा. हळूहळू त्या कमजोरीलाच आपली शक्ती बनवावे, हे सहजशक्य असते. जसे ज्याचे हस्ताक्षर चांगले आहे, त्याच्याकडून कोणत्या गोष्टींचा सराव करायचा, हे समजून घ्यावे व तासन्तास सराव करावा. एखाद्या सुगरण महिलेकडून मसाला कसा करावा किंवा व्यवस्थित फोडणी कशी घालावी, हे शिकून सतत सराव करावा. हीच गोष्ट संवादकौशल्य, इंटरनेट, मोबाईल, संभाषण कौशल्य, मानव संसाधन, शिकविणे अशा सर्वच क्षेत्रात वापरता येते. काही लोकांना हे विचित्र वाटेल. असे कसे शक्य आहे. नवीन गोष्टी कशा शिकता येतील, हे वाटणे शक्य आहे. पण याच लोकांनी लहानपणी हीच पद्धत वापरून सायकल शिकली होती. याच पद्धतीने कार चालविणे, संगणक हाताळणे शिकले असतील. अगदी गेल्या चार-पाच वर्षात अँड्रॉईड मोबाईल आणि अगदी आत्ता आत्ता कोरोना टाळेबंदीमुळे हेच लोक व्हिडिओ कॉल किंवा झूम अथवा गूगल मीट शिकले. समर्थ रामदास म्हणत... ‘केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे’. पाहा, समर्थांसारख्या साडेतीनशे वर्ष जुन्या व्यक्तिमत्त्वाला यशाचे हे तंत्र अवगत होते.
 
 
क्रिकेटच्या भाषेत ‘यॉर्कर’ हा चेंडू आहे, जो कुणीही खेळू शकत नाही. अगदी डॉन ब्रॅडमनपासून सचिन तेंडुलकरपर्यंत यॉर्कर हा सगळ्यांसाठी कळीचा मुद्दा असे. पण कुणीही हा चेंडू खेळायला शिकले नाही. एक अठरा-एकोणवीस वर्षांचा व कर्तृत्वाने अत्यंत सामान्य मुलगा रांचीला राहत असे. मैदानात सामना खेळताना त्याने आपल्या गोलंदाजाला सांगितले की, समोरच्या संतोष नामक फलंदाजाला यॉर्कर टाक. त्याने उत्तम यॉर्कर टाकला, पण संतोषने अविश्वसनीय पद्धतीने बॅट फिरवून यॉर्करवर छक्का मारला. रांचीचा तो तरुण हे पाहून आश्चर्यचकित झाला व त्याने संतोषला गळ घातली की, मला हा फटका मारायला शिकवावा. रात्रंदिवस मेहनत करून त्या युवकाने तो फटका आत्मसात केला. पुढे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघाकडून खेळताना मेलबर्न क्रिकेट स्टेडियमच्या अतिभव्य मैदानात जगातील सर्वात वेगवान गोलंदाज ब्रेट ली याच्या एका यॉर्करवर याच तरुणाने तोच फटका मारला व षटकार ठोकला. सारे खेळाडू, प्रेक्षक, पंच, समालोचक, टीव्हीवर तो सामना बघणारे आमच्यासारखे दर्शक अवाक् राहिले. त्या दिवशी जगाला भारताच्या क्षितिजावर उगविणारा एक नवा खेळाडू गवसला, ज्याचे नाव होते महेंद्र सिंग धोनी व त्या फटक्यांचे नाव ठरले ‘हेलिकॉप्टर शॉट’.
 
 
ऑस्ट्रेलिया ऑलिम्पिकमध्ये सपाटून मार खाल्लेला मिल्खा सिंग असो, लहानपणी कुस्तीमध्ये कुठलाही रस नसलेल्या गीता-बबिता फोगट असो, आवाज घोगरा आहे म्हणून आकाशवाणी केंद्रावरून डावलण्यात आलेला अमिताभ बच्चन असो. या सर्वांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी त्यांना न येणार्‍या गोष्टी मेहनतीने शिकाव्या लागल्या आहेत. ज्यांनी प्रयत्नांती आपले कौशल्य विकसित केले आहे. त्यांच्याच गळ्यात यशश्रीने माळ घातली आहे. कौशल्य विकासाचा मंत्र ध्यानी घेऊन जे आपल्या आयुष्यात त्यावर काम करतील, ते पुढे गेल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित.
- डॉ. सुमंत दत्ता टेकाडे
9923839490
(लेखक कॉर्पोरेट आणि व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षक आहेत.)