वरवरा रावच्या अंतरिम जामीनाला उच्च न्यायालयाची मंजूरी

    दिनांक :22-Feb-2021
|
मुंबई,
शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देणारे लेखक-कवी म्हणून ओळख असलेले वरवरा राव यांना आज २२ फेब्रुवारी २०२० रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. ८२ वर्षांचे राव यांची वैद्यकीय कारणास्तव तातडीच्या अंतरिम जामिनावर सुटका करावी अशी मागणी त्यांच्या पत्नी हेमलता यांनी स्वतंत्र याचिकेद्वारे केली होती. याचिकेवर आज सुनावणी करताना न्यायालयाने ५० हजारांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला आहे.

varvara_1  H x
गुन्ह्याचे स्वरुप लक्षात घेता राव यांना त्यांच्या हैदराबादमधील घरी जाण्यास न्यायालयाने परवानगी दिलेली नाही. राव यांनी मागील ३६५ दिवसांपैकी १४९ दिवस विविध रुग्णालयात घालवले आहेत. त्यातून त्यांची वैद्यकीय स्थिती लक्षात येते, असा युक्तिवाद राव यांच्या कुटुंबियांतर्फे सुनावणीच्या वेळी करण्यात आला होता.
राव यांचे वय, आरोग्य आणि कैद्याचा वैद्यकीय सुविधा मिळण्याचा मूलभूत अधिकार लक्षात घेता त्यांना वैद्यकीय जामीन मंजूर करत आहोत, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. सध्या त्यांना सहा महिन्यांचा जामीन देण्यात आला असून त्यानंतर त्यांनी शरणागती पत्करावी वा जामिनाची मुदत वाढवण्यासाठी अर्ज करावा असे न्यायालयाने निकालामध्ये म्हटले आहे. राव यांना विशेष न्यायालयाच्या परिसरातच राहावे लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.