टाळेबंदीवरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

    दिनांक :22-Feb-2021
|
 मुंबई,
 गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित करत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आठ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार असल्याचे  मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.टाळेबंदीवरून आता राज्यातील विरोधी पक्षांनी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.
 

nilesh rane _1   
 
 
 अधिवेशनाच्या तोंडावरच  कोरोना का ?- निलेश राणे  
महाराष्ट्रात १४०० ग्रामपंचायत निवडणूक झाल्या,महाराष्ट्रात कित्येक आंदोलने झाले परंतु तेव्हा कोरोना वाढला नाही.मात्र राज्यात होणाऱ्या अधिवेशनाच्या तोंडावरच कोरोना का वाढला ?असा सवाल भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी सरकारला केला आहे.
 
 सरकारमधील नेत्यांना झालेला कोरोना खरा की राजकीय?- नितेश राणे  
 ‘ठाकरे सरकारमधील नेत्यांना झालेला कोरोना खरा आहे की राजकीय?’ असा सवाल भाजप नेते व आमदार नितेश राणे यांनी  उपस्थित केला आहे.गेल्या दीड वर्षात राज्याच्या कानाकोपऱ्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे फिरत होते. आतापर्यंत त्यांना कधीही कोरोना झाला नाही. अधिवेशनाला आठ दिवस शिल्लक असतानाच त्यांना कोरोना झाला. छगन भुजबळांनाही नेमका सकाळीच झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेदेखील कुटुंबासोबत संवाद यात्रेसाठी राज्यभर फिरत आहेत. त्यांना आतापर्यंत कोरोना झाला नव्हता, तोही काही दिवसांपूर्वी झाला. म्हणून हा एक वेगळ्या प्रकारचा कोरोना महाराष्ट्रात आला नाही ना असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आहे,’ असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. 
 
 लोकांच्या  प्रश्नांची सरकारला उत्तर द्यायची नाही - मनसे 
“मुख्यमंत्र्यांना घरात लपून बसायचं आहे. त्यांना अधिवेशन काळामध्ये लोकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायची नाहीयत म्हणून तुम्ही लोकांना लॉकडाऊनची धमकी देणार का?, इतके दिवस रुग्ण वाढले नाही. आताच बरे रुग्ण वाढले. आणि रुग्णवाढीचं काय कारण सांगितलं जात आहे तर ट्रेन पुन्हा चालू झाल्या. ट्रेनआधी पूर्णपणे बंद होत्या का? कशामुळे वाढले रुग्ण?, ही सरकारची नाटकं सुरु आहेत. ये पब्लिक हैं सब जानती है,” असं म्हणत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारला लक्ष केले आहे . “सावधान सध्या करोना चा नवीन स्ट्रेन आला आहे त्याच नाव विधिमंडळ अधिवेशन करोना अस आहे जो शरीरावर कमी पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो,” असं खोचक ट्विटही देशपांडे यांनी केलं आहे.