माघी एकादशी निमित्त विठ्ठलाला फुलांची आरास

    दिनांक :23-Feb-2021
|
पंढरपूर,
माघी यात्रा व जया एकादशी सोहळ्यानिमित्त मंदिर समितीच्यावतीने विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. आज देखील माघी यात्रेनिमित्त सजावट करण्यात आली. केशरी व पिवळा झेंडू, शेवंती, ग्लँडीओ, ऑर्किड, ब्लूडीजे, सँगो अशा रंगीत फुलांची आरास केली आहे. यासाठी लागणारी फुले ही पुणे येथील सचिन चव्हाण, संदीप पाटोळे पाटील, युवराज सोनार यांच्यावतीने देण्यात आली आहेत. त्यासाठी पन्नास हजार रुपयांचा खर्च आला आहे. या फुलांची आकर्षक आरास विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराला अधिक प्रसन्न करत आहे.या सजावटीसाठी विविध प्रकारच्या एक टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. मंदिर गाभाऱ्याशिवाय नामदेव पायरी, सभामंडप याठिकाणीही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
 
maghe _1  H x W
 
संचारबंदीचा दुसरा दिवस
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या माघी यात्रेत गर्दी होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे मंदिर समितीकडून विठ्ठल व रुक्मिणी मातेचे मुखदर्शन 22 ते 23 फेब्रुवारी रोजी भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, यादरम्यान पांडुरंगाची नित्यपूजा पार पडणार आहे. 24 फेब्रुवारीला सकाळी सहा वाजल्यापासून विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मुखदर्शन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. भाविकांनी पंढरपुरात गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरात दोन दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
 
द्वादशीलाही विठ्ठल मंदिर राहणार बंद
माघवारीकरिता पंढरपूर येथे मठात येऊन बसलेले भाविक, तसेच संचारबंदी असलेल्या पंढरपूर शहरासह १० गावांतील भाविक हे मोठ्या संख्येने द्वादशीला विठ्ठल दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. यामुळे गर्दी वाढून कोरोना वाढण्याची भीती अधिक असल्याने जिल्हा प्रशासनाकडून भाविकांच्या आरोग्याची काळजी घेत विठ्ठल द्वादशीला देखील बंद ठेवण्याबाबत मंदिर समितीला पत्र पाठवून निर्णय घ्यावा अशी सूचना केली होती. त्यानुसार मंदिर समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत द्वादशीला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे भाविकांनी बुधवारी द्वादशीला दर्शनासाठी मंदिराकडे येउ नये, असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले आहे.