१०० व्या कसोटीनिमित्त्य इशांत भावूक

    दिनांक :23-Feb-2021
|
- फिटनेसवर लक्ष दिल्यास फळ मिळते
अहमदाबाद,
भारत आणि इंग्लंडच्या संघामध्ये खेळवला जाणारा तिसरा कसोटी सामना भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मासाठी सर्वार्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. हा सामना इशांत शर्माचा १०० वा कसोटी सामना ठरणार आहे. याबरोबरच इशांत शर्मा हा १०० कसोटी सामने खेळणारा भारताचा कपिल देव  यांच्यानंतरचा दुसरा वेगवान गोलंदाज ठरणार आहे. यावेळी तो म्हणाला कि, माझी कसोटी कारकीर्द एवढी दीर्घकाळ चालली याचं कारण म्हणजे कर्णधाराला काय अपेक्षित आहे हे मला नेमके कळते, असे इशांतने सांगितले. तसेच कारकीर्दीत मिळालेल्या यशासाठी झहीर खानचा विशेष उल्लेख केला. इशांत म्हणाला, मी झहीर खानकडून खूप काही शिकतो. मी त्याच्या मेहनतीमधून शिकलो आहे. जर तुम्ही तुमच्या फिटनेसवर लक्ष दिले तर तुम्हाला त्याचे फळ मिळेल, असे मी संघातून खेळणाऱ्यांना सांगतो.इशांत शर्माने बांगलादेशविरुद्ध वयाच्या १८ व्या वर्षी राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.  

ishant _1  H x  
  
एकदिवसीय आणि टी-२० संघात समावेश नसल्याने कसोटी कारकीर्द लांबली का, असे विचारले असता इशांत म्हणाला की, मी या शापाकडे वरदानासारखे पाहतो. मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळायचे नव्हते, असे नाही. मात्र जेव्हा खेळायची संधी मिळाली नाही. तेव्हा मी सराव चालू ठेवला. एकदिवसीय संघात स्थान न मिळाल्याने कसोटी क्रिकेटमधील कामगिरीवर परिणाम होऊ नये यासाठी मी खबरदारी घेत होतो. क्रिकेटच्या किमान एका प्रकारात मला खेळता आले यासाठी मी समाधानी आहे. मी सध्या कसोटी विश्वअजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. हा सामना माझ्यासाठी विश्वचषकासारखा आहे आणि त्याला जिंकून एकदिवसीय विश्वचषक जिंकल्याचा अनुभव मला घ्यायचा आहे.