दूध उत्पादक, डेअरी चालकांना लॉकडाऊन काळात सवलत

    दिनांक :23-Feb-2021
|
बुलडाणा,
लॉकडाऊनमुळे जिल्हाधिकार्‍यांनी सर्वच गोष्टींवर निर्बंध आणले आहेत.या निर्बंधात मात्र दूध उत्पादक शेतकरी, दूध वितरक आणि संकलन केंद्र संचालकांची गोची करण्यात आली होती. दूध कोणत्या वेळेत निघते, त्याचे संकलन आणि विक्रीची वेळ यात संचारबंदीच्या आदेशात मोठी तफावत ठेवल्याने होणारे नुकसान पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकारी एस.रामामूर्ती यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी तातडीने लॉकडाऊनचे आदेश पारित करतानाच त्यामध्ये दूध उत्पादकांना, संकलन व वितरण केंद्रे यांना हवी असलेली सुधारित वेळ ठरवून दिली आहे.

buldhana d_1  H 
 
लॉकडाऊनच्या काळात आता सकाळी 6 ते दुपारी 3 आणि सायंकाळी 6 ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत दूध उपलब्ध राहणार आहे. म्हणजेच सकाळपासून दुपारपर्यंतचे 9 तास आणि सायंकाळचे अडीच तास दूध विक्रेत्यांना मिळणार आहेत. तुपकर यांनी हा प्रश्न रेटून धरल्याने त्यावर प्रशासनाला तत्काळ निर्णय घेणे भाग पडले. यामुळे दूध उत्पादक, विक्रेते व संकलन केंद्र संचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गायी, म्हशींपासून मिळणार्‍या दुधावरच अनेक शेतकर्‍यांचा चरितार्थ चालतो. या शेतकर्‍यांवर दूध विक्रेते व संकलनकर्त्यांची कुटुंबे अवलंबून आहेत. अमरावती विभागात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अंशतः लॉकडाऊन सुरू झाले आहे. तसेच बुलडाणा जिल्ह्यात जिल्हाधिकार्‍यांनी संचारबंदी लागू करून सर्वांसाठी नियम घालून दिले आहेत. दुग्ध व्यवसाय व दुग्धजन्य व्यवसाय करणार्‍यांसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 अशी वेळ ठरवून देण्यात आली होती. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी ही बाब स्वागतार्ह असली तरी दूध उत्पादक शेतकरी व व्यावसायिकांचे यामुळे नुकसान होणार असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी 22 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांची भेट घेतली.
 
 
दुधासंदर्भातील अडचणी आणि शेतकरी, विक्रेत्यांचे होणारे नुकसान याचा पाढाच तुपकरांनी मांडला. प्रशासनाच्या वेळेनुसार दूध आणणे, विकणे याचा मेळ बसणे शक्यच नसल्याचे तुपकर यांनी सविस्तर लक्षात आणून दिले. तसेच लहान मुले, रुग्णांना दूध आवश्यक असल्याचेही त्यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले. आयुक्तांशी चर्चा करून तातडीने सुधारित आदेश काढण्यात आला. त्यानुसार सकाळी 6 ते दुपारी 3 व सायंकाळी 6 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत दूध विकण्यासाठी सवलत देण्यात आली आहे.