लाल किल्ला हिंसाचारातील दोघांना जम्मूतून अटक

    दिनांक :23-Feb-2021
|
नवी दिल्ली, लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराप्रकरणी आणखी दोन जणांना दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली जम्मू येथे केलेल्या कारवाईदरम्यान दोन जणांना अटक केल्याची माहिती मिळाली आहे. मोहिंदर सिंग आणि मनदीप सिंग अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून, ते जम्मूचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे.प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराप्रकरणी या दोघांची भूमिका महत्त्वाची होती.
jammu _1  H x W
 
लाल किल्ला हिंसाचाराच्या कटाचे ते सूत्रधार होते, असा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या मदतीने या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या दोघांना आता न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. मोहिंदर सिंग यांच्या पत्नीने ते निर्दोष असल्याचा दावा केला आहे. जम्मू पोलिसांच्या वरिष्ठ अधीक्षकांनी बोलावले आहे, असे सांगून मोहिंद सिंग गेले. त्यानंतर त्यांचा फोन बंद येऊ लागला. चौकशी केल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली असून, दिल्लीला घेऊन गेल्याची माहिती मिळाली. लाल किल्ल्यावर हिंसाचार झाला, तेव्हा ते भारतीय सीमेवर होते. मोहिंदर सिंग यांनी काही चुकीचे केले नाही, असा दावा त्यांच्या पत्नीने केला आहे.