होळी व रंगोत्सवावर कोरोनाचे सावट

    दिनांक :27-Mar-2021
|
- बाजारपेठ सजली पण...
 
तिवसा, 
कोरोना आजाराची वर्षपूर्ती झाली आहे. यंदा दुसर्‍या वर्षीही राज्यातील होळी-रंगोत्सवावर कोरोनाचे सावट कायम असून यामुळे गाठ्या, पिचकार्‍या व विविध मातीच्या रंगानी सजलेल्या बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी मात्र ओसरली आहे. दरवर्षी होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सर्वत्र नागरिक सज्ज असतात. 
 
corna_1  H x W:
 
या सणाला सायंकाळी लाकूड, केरकचरा, गोवरी, चाकोली यांची होळी पेटवून पूजा केली जाते तर दुसर्‍या दिवशी रंगोत्सव साजरा केल्या जातो. एक मोठा उत्साह या होळी व धुळवडीचा असून या उत्सवाचा गेल्या दोन वर्षांपासून बेरंग झाला आहे. ऐन होळीसारख्या सणाच्या तोंडावर गेल्यावर्षी पासून कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे. एकीकडे मनात होळी, रंगोत्सव साजरा करण्याची इच्छा नागरिकांच्या मनात असतांनाही कोरोना या महामारीमुळे, भीतीमुळे यंदा दुसर्‍या वर्षीची धुळवड ही भयावह वातावरणात कशी साजरी करायची, असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.
 
  
कोरोनाचे संकट असल्याने शासनाने खबरदारीच्या दृष्टीने अनेक निर्बंध आणले असले तरी होळी या सणाच्या तोंडावर तिवसा शहरातील बाजारपेठ ही गाठ्या, पिचकार्‍या, विविध मातीच्या रंगानी सजली असून पाहिजे तशी ग्राहकांची वर्दळ खरेदीच्या दृष्टीने बाजारपेठेत दिसून येत नाही. बाजारपेठ सज्ज झाली असली तरी ग्रामीण भागातून खरेदीसाठी जी झुंबड कोरोनापूर्वीपासून चालत आलेली होती, ती आता नसल्याने दुकानदारानी चिंता व्यक्त केली आहे. याचा फटका थेट गाठी व्यावसायिक ते दुकानदार यांना बसत आहे. यातच वाढत्या महागाईमुळे गाठीचे दरही वधारले असल्याचे दिसून येत आहे. एकूणच कोरोनाच्या सावटात यंदाही होळी, रंगोत्सव साजरा होणार असून सर्वानी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे केल्या जात आहे.
 
 
दुकानदारांना चिंता
दुकानदार मंगेश सोनोने याबाबत बोलताना म्हणाले की, मी दरवर्षी तिवसा शहरात गाठ्या विक्रीचा छोटेखानी व्यवसाय करतो. गाठ्या खरेदीसाठी गावखेड्यातून अनेक जण येतात. ग्राहकांना गाठ्या देण्यात धावपळ होते. मात्र यंदा तर ग्राहकांची पाहिजे तशी गर्दी दिसून येत नसल्याने गाठ्या विकल्या जाणार की नाही, ही चिंता भेडसावत आहे.