मनपाचे डॉक्टर्स देणार मेयोत सेवा

    दिनांक :27-Mar-2021
|
- महापौर दयाशंकर तिवारींची मेयोला भेट
नागपूर,
महापौर दयाशंकर तिवारी यांनी आज मेयो रुग्णालयात जाऊन तेथील कामाचा आढावा घेतला. डॉक्टरांची कमतरता बघता मनपाच्या सेवेतील काही डॉक्टर्स मेयोमध्ये सेवा देतील. त्यादृष्टीने तातडीने कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

ngp _1  H x W:  
 
मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सागर पांडे, सामाजिक कार्यकर्ते बबलू कुकरेजा उपस्थित होते. महापौर दयाशंकर तिवारी यांनी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सध्या मेयोमध्ये असलेली व्यवस्था, रुग्णशय्यांची स्थिती, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची स्थिती, प्राणवायूची उपलब्धता आदींचा आढावा घेतला. मेयोमध्ये उपलब्ध ६००पैकी ४८० रुग्णशय्या कोरोना रुग्णांसाठी राखीव आहेत. कोरोना झालेल्या किडनीचे आजार असलेल्या १५, गरोदर स्त्रियांसाठी १५ रुग्णशय्या राखीव आहेत. एक ४० रुग्णशय्यांचा वार्ड कोरोनातून बरे झालेले मात्र काही आजार झालेल्या रुग्णांसाठी, संशयित रुग्णांसाठी सारीचे दोन वार्ड राखीव आहेत.
 
 
मेयोत इंटर्नशिप करणाऱ्या सुमारे ७० डॉक्टरांची परीक्षा असल्याने त्यांच्या जागी नव्या डॉक्टरांची आवश्यकता आहे. मेयोने प्रशासनाकडे ७५ डॉक्टरांची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी २५ डॉक्टर्स देण्याचे आश्वासन दिले. त्यापैकी १५ डॉक्टर्स पाठविले, त्यापैकी ७ डॉक्टर्स रुजू झाले. मनपाने ९ डॉक्टर्स पाठविले. ते रुजू झालेत. अतिरिक्त डॉक्टर्स लागतील, त्याची पूर्तता मनपाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे. मेयो प्रशासनाने तसे पत्र मनपाला दिले आहे. यासंदर्भात मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्याशी चर्चा झाली असून उद्या १५ डॉक्टर्स रुजू होतील, असे महापौरांनी सांगितले. मेडिकल आणि मेयो रुग्णालयांचे संचालन व्यवस्थितपणे करण्यासाठी दोन्ही रुग्णालयांची जबाबदारी आयएएस अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. रुग्णालयातील अधिकारी आरोग्य सेवेचे व्यवस्थापन बघतील तर प्रशासनाने जबाबदारी दिलेले अधिकारी मनुष्यबळाचे व्यवस्थापन बघतील, असेही महापौरांनी सांगितले.