होळी, धूलीवंदनावर प्रतिबंधाचे सावट

    दिनांक :27-Mar-2021
|
अकोला, 
जिल्ह्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे होळी व धुलिवंदन सणावर प्रतिबंधाचे सावट आहे. गत वर्षी कोरोना सावटात साजर्‍या झालेल्या या सणांवर यावर्षीही प्रतिबंध आहे. सोबतच तिथीनुसार येणारी शिवजयंती, गुडफ्रायडे व इस्टर संडे बाबतही जिल्हाधिकार्‍यांनी प्रतिबंधात्मक आदेश घोषित केले आहेत.
 
ak_1  H x W: 0
 
जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर नागरिकांनी सण व उत्सव अत्यंत साधेपणाने साजरे करावे, कोणत्याही प्रकारे गर्दी करू नये, धूलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाणे घरात व नियमांचे पालन करून साजरे करावे. भौतिक दूरतेचे पालन करत, गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी कोणत्याही प्रकारे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
 
 
गुड फ्रायडे व इस्टरची प्रार्थनाही नियमांच्या अधीन राहून करावी.28 मार्च ते 4 एप्रिल या दरम्यान प्रत्येक प्रार्थनासभेच्या वेळी चर्चमध्ये उपलब्ध जागेनुसारच लोकांच्या उपस्थितीचे नियोजन करावे. जास्तीत जास्त 50 व किमान 10 ते 25 लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे, असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात 476 नवे बाधित, चौघांचा मृत्यू
 
जिल्ह्यात शनिवार, 27 मार्च रोजी 476 नवे बाधित आढळले. उपचारानंतर 227 जणांना सुटी देण्यात आली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळा चाचणी तपासणीत 288 तर जलद चाचणी तपासणीत 188 असे एकूण 476 जण बाधित आढळले.
 
 
शनिवारी उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला. यात तेल्हारा येथील 55 वर्षीय पुरूष, लहान उमरी येथील 70 वर्षीय पुरूष, मूर्तिजापूर तालुक्यातील अकोली जहाँगीर येथील 74 वर्षीय महिला तर जुने शहर येथील 69 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. विविध उपचार केंद्रातून 227 जणांना उपचारानंतर सुटी देण्यात आली. सद्यस्थितीत विविध रुग्णालयात 6646 सक्रिय बाधितांवर उपचार सुरू आहेत.