रेड्डींची राज्यपालांकडे करणार तक्रार : नवनीत

    दिनांक :27-Mar-2021
|
- विशेष पोलिस महानिरीक्षकांची घेतली भेट
तभा वृत्तसेवा
अमरावती,
हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांना आत्महत्त्या करण्यास प्रवृत्त करणार्‍या उपवनसंरक्षक शिवकुमार इतकेच अपर मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी जबाबदार आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी आधी राज्यपालांकडे तक्रार करणार व नंतर संसदेत आवाज उठवणार, असे खासदार नवनीत राणा यांनी सांगितले.
 
am_1  H x W: 0
 
सदर प्रकरणा संदर्भात खा. नवनीत आणि आ. रवी राणा यांनी शनिवारी विशेष पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांची भेट घेतली. त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. अपर प्रधान मुख्य वन संरक्षक रेड्डी यांचे नाव दीपाली चव्हाण यांनी पत्रात लिहिले असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा, अशी मागणी आम्ही केली. त्यावर बोलताना विशेष पोलीस महानिरीक्षकांनी या प्रकरणाची चौकशी पोलिस उपअधीक्षक पातळीवर सुरू आहे. चौकशीत रेड्डीचा संबंध आढळला तर नक्की त्याला अटक करू आणि जर संबंध नसेल तर तसेही मी स्पष्ट सांगेल, असे त्यांनी सांगितल्याचे राणा दाम्पत्य म्हणाले.
 
 
प्रशासन ऐकत नाही
 
दीपाली चव्हाण यांनी वर्षभरापूर्वी पतीसह घरी येऊन माझ्याकडे व्यथा मांडली होती. त्यानंतर शिवकुमार विरोधात कारवाई करा किंवा दीपाली चव्हाणची बदली करा, असे मी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांना सांगितले होते. मात्र, रेड्डीने दखल घेतली नाही. जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती यांच्याकडेही हा विषय गेला होता. ठाकूर यांनी सांगितल्यावरही रेड्डीने काही ऐकले नाही. खासदार आणि पालकमंत्र्यांचेही अधिकारी ऐकत नाहीत याबाबत नवनीत राणा यांनी रोष व्यक्त केला.
 
 
महिला वन अधिकार्‍यांनी मांडल्या व्यथा
 
विशेष पोलिस महानिरीक्षक मीणा यांनी महिला वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांना रेड्डी बाबत काही सांगायचे असेल तर त्यांनी माझ्याशी बोलावे, असे म्हटले होते. त्यावर सात ते आठ महिला वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांनी स्वतंत्रपणे भेट घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे शिवकुमार आणि रेड्डी यांच्या मनमानी कारभाराबाबत तक्रारी मांडल्या.