महाआघाडी सरकारला घेऊन जाय वं मारबत!

    दिनांक :27-Mar-2021
|
- अचलपुरात भाजपा कार्यकर्त्यांनी केली होळी
- दीपाली आत्महत्या प्रकरणाचे पडसाद
तभा वृत्तसेवा
अचलपूर, 
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अपर मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांना पाठीशी घालणार्‍या, विशाखा कायदा न राबवणार्‍या आणि राज्य महिला आयोगाला अध्यक्ष न नेमणार्‍या महावसुली सरकारला घेऊन जाय वं मार्बत, अशा आरोळ्या ठोकत शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जयस्तंभ चौकात होळी साजरी केली. होळीच्या बोंबा ठोकत अचलपूर भाजपाच्या आंदोलनात भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी या वरिष्ठांसह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाग घेतला.
 
am_1  H x W: 0
 
मेळघाटातील गुगामल येथे कार्यरत वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्ये प्रकरणी गुगामलचे उप वन संरक्षक विनोद शिवकुमार व क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी हे दोघेही दोषी असूनदेखील रेड्डी यांना अजुनही निलंबित करण्यात आले नाही. त्यांना निलंबित करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी व दीपाली चव्हाण यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येने समाजमन हेलावले आहे. विनोद शिवकुमार यांनी एका महिला सहकारी अधिकार्‍याला दिलेली वागणूक ही अत्यंत अपमानास्पद आहे. मुख्यमत्र्यांकडे वन खाते असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकार्‍यांना सुट दिली आहे. एक महिला अधिकारी न्यायासाठी महिला पालकमंत्री, अधिकार्‍यांकडे धाव घेते, पंरतु न्याय मिळत नाही. राज्यासाठी ही लज्जास्पद बाब आहे. रेड्डी यांनाही त्वरित निलंबित करावे, अशी मागणी यावेळी निवेदिता चौधरी यांनी केली. यावेळी दोन मिनिटे मौन बाळगून दीपाली चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आंदोलन प्रसंगी अभय माथने, सुधीर रसे, विशाल काकडे, नितीन डकरे, निलेश सातपुते, मनीष लाडोळे, विनिता धर्मा, ललित ठाकूर, प्रवीण तायडे, आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.