रानडुकरांचा धुमाकूळ सुरूच

    दिनांक :27-Mar-2021
|
तभा वृत्तसेवा
राळेगाव, 
आजमितीस गहू व हरभरा काढणीस आला असून काही निघालाही आहे. पण सोंगणीस आलेल्या गहू हरभर्‍यालाही रानडुकरांनी सोडले नसून त्याचेही मोठ्या प्रमाणात ते नुकसान करीत आहेत व शेतकर्‍यांचा हातातोंडाशी आलेला घास जंगली प्राणी अशा रीतीने हिसकावून घेत आहे.
 
ytr_1  H x W: 0
 
शहरासह तालुक्यात रानडुक्कर, रोही, हरीण आदी वन्यप्राण्यांचा शेतमाल व पिकाला मोठा त्रास आहे. वन्यप्राणी पिकाचे भरून न निघणारे नुकसान करतात. त्यांंच्या त्रासामुळे शेतकरी पीकपद्धतीत बदल करतात. रानडुकरांचा त्रास गव्हाच्या तुलनेत हरभर्‍याला जास्त होतो. त्यामुळे शेतकर्‍यांनी हरभरा लावण्याची इच्छा असूनही नाईलाजाने गहू लावला. पण त्यांचा भ्रमनिरास झाला. गव्हालाही रानडुक्कर व रोह्यांनी सोडले नाही. गव्हाचेही त्यांनी मोठे नुकसान केले.
 
 
शेतात ठिकठिकाणी हे वन्य प्राणी धुडगूस घालत असून गहू हरभरा मातीमोल करीत आहेत. महत्त्वाचे म्हणजे यांनी नुकसान केलेले पीक एक टक्काही हाती येत नाही. ते मातीमोलच होते. वन्यप्राण्यांचा अटकाव करण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या जातात त्या सगळ्या कुचकामी ठरतात. वन्यप्राणी शेतमाल मातीमोल करतात व शेतकर्‍याला त्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्याखेरीज दुसरा पर्याय नसतो. हे दुष्टचक्र कधी थांबेल हेच शेतकर्‍यांना कळेनासे झाले असून एकतर रानडुकरांना वनविभागाने मारून टाकावे किंवा आम्हाला मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे. रानडुकरांमुळे कुठलीही वन्यजीवांची साखळी तुटणार नसल्याने मोठ्या प्रमाणात संख्या असलेल्या रानडुकरांना ठार मारावे किंवा त्यांची संख्या तरी नियंत्रित करावी, अशी मागणी यावेळी शेतकर्‍यांकडून पुढे आली आहे.