आरी पोटात घुसूनही युवकाचे प्राण वाचविले

    दिनांक :27-Mar-2021
|
- जिल्हा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
- गुंतागुंतीच्या दोन शस्त्रक्रिया यशस्वी
 
अमरावती,
सेंट्रिंगचे काम करत असताना अपघाताने एका युवकाच्या पोटात आरी घुसून त्याची आतडी बाहेर पडली. त्या गंभीर अवस्थेत त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा रूग्णालयाच्या पथकाने तत्काळ त्याच्यावर उपचार सुरू करत शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. त्यामुळे या युवकाला जीवनदान मिळाले असून, तो सुखरूप आहे. गेल्या आठवड्यात जिल्हा रुग्णालयातील सर्जन डॉ. संतोष राऊत यांच्या पथकाने आतड्यांवरील गुंतागुंतीच्या दोन शस्त्रक्रिया यशस्वी केल्या असून, हे दोन्ही रुग्ण सुखरूप आहेत. 
 
saw_1  H x W: 0
 
मोर्शीच्या रामजी बाबानगरातील रहिवासी अजय भलावी हा साधारणत: पंचवीस वर्षाचा युवक आहे. तो 19 मार्चला सेंट्रिगचे काम करत होता. त्यावेळी आरी चालवत असताना अचानक त्याच्या डोळ्यात कचरा गेला व तत्क्षणी अपघाताने आरी त्याच्या पोटात घुसून त्याची आतडी बाहेर पडली. अत्यंत गंभीर अवस्था होती. मात्र, त्याचे नातेवाईक व परिचितांनी हिंमत ठेवून अजिबात वेळ न दवडता त्याला मोर्शी येथील डॉक्टरांकडे नेले. तेथील डॉक्टरांनी ही अवस्था पाहून त्याला अमरावती जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे अजयला तत्काळ अमरावतीला आणून इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले. इर्विन रुग्णालयातील वॉर्ड क्र. 16 येथील शल्यचिकित्सा विभागात अजय दाखल होताच तेथील तज्ज्ञ डॉ. संतोष राऊत यांनी स्थिती लक्षात घेऊन तत्काळ शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला व अजयला ऑपरेशन थिएटरमध्ये हलविण्यात आले. उत्तम टीमवर्क ठेवत तज्ज्ञांच्या पथकाने यशस्वीपणे ही शस्त्रक्रिया पूर्ण केली. शस्त्रक्रियेनंतर त्याला आवश्यक औषधोपचार देण्यात आले. अजयची प्रकृती आता सुधारली आहे.
 
 
दरम्यान, 20 मार्चला इर्विनच्या शल्यचिकित्सा विभागात पोटाची आतडी फाटलेल्या एका युवकावरील गुंतागुंतीची शस्त्रक्रियाही यशस्वीपणे पूर्ण झाली. पंकज कदम हे अकोला जिल्ह्यातील मोहोड या गावाचे रहिवाशी असून, ते काही वर्षांपासून पुण्यात राहतात. पुण्यात एके दिवशी लिव्हरवर सूज आल्याने कदम यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना पुण्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुखणे कमी झाले नाही. पुण्यात त्यांनी तीन रूग्णालयात उपचार घेतला. एक लाख 10 हजार रुपये खर्च झाला. मात्र, फारसा उपयोग झाला नाही. पंकज कदम यांची बहीण अमरावती जिल्ह्यात निमदरी येथे राहते. त्यांनी अमरावतीला इर्विनमध्ये चांगले उपचार मिळत असल्याने तिथे दाखल होण्याचे सुचविले. त्यानुसार पंकज यांना 20 मार्चला दाखल करण्यात आले. पंकज यांची पोटाची आतडी फाटलेली व जठराला नुकसान झाल्याचे डॉ. राऊत यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार पंकज यांच्यावरही यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून, ते सुखरूप आहेत. इर्विनमध्ये योग्य उपचार मिळून जीवदान मिळाल्याबद्दल पंकज यांनी इर्विन टीमप्रती कृतज्ञता व्यक्त केली.