होलिका दहनासाठी गोवर्‍यांचा वापर करा

    दिनांक :27-Mar-2021
|
- वसुधा वुडलेस क्रिमेशन फाऊंडेशनचे आवाहन
अकोला, 
होलिका दहनासाठी वृक्षांची कत्तल आणि वृक्षांचे दहन यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होतो आहे. वृक्षांची कत्तल करून त्याचे दहन करण्याऐवजी गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गोवर्‍यांचा वापर होलिका दहनासाठी करावा असे आवाहन वसुधा वुडलेस क्रिमेशन फाऊंडेशनचे संचालक डॉ. संदीप डी. जयपूरकर यांनी केले.
 
ak_1  H x W: 0
 
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी लाकूड विरहित होलिका दहन ही संकल्पना रुजणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीचे अभिन्न अंग असलेली होळी सामाजिक आशय सांगणारा व आध्यत्मिक महत्व असलेला सण आहे. होळीचा हा उद्देश समजून होळी साजरीकरणे आवश्यक आहे. होलिका ही महाराक्षस हिरण्यकश्यपाची बहीण होती.भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी तिची योजना करण्यात आली. कारण तसे तिला वरदान होते पण चांगल्या कामासाठीच त्या वरदानाचा वापर करावा अशी अटही होती. होलिकेने वाईट कामासाठी अर्थात एका भक्ताच्या हत्येसाठी या वरदानाचा वापर केला आणि त्यात तीच भस्मसात झाली अशी कथा आहे. आपल्या मनातील दुष्ट भावना, वासना आदींना जाळून टाका असा संदेश देणार्‍या या उत्सवाचे निमित्ताने मोठ्या प्रमाणावर होणारी पर्यावरण हानी दुर्दैवी आहे. स्वच्छ व निरोगी पर्यावरणाकरिता असलेले वृक्षांचे महत्व सर्वांनाच माहिती असताना होळीसाठी वृक्षांची कत्तल योग्य नाही. प्राणवायू देणार्‍या वृक्षांचे संरक्षण करून वातावरण शुद्धी आणि वातावरणातील विषाणू नष्ट करणार्‍या गायीच्या गोवर्‍यांचे दहन होळीत करावे, असे आवाहनही त्यांनी केले. विशेष म्हणजे वसुधा वुडलेस क्रिमेशन फाऊंडेशनद्वारा अकोल्यातील उमरीतील स्मशानभूमित गोवर्‍याद्वारा आणि लाकूड विरहित अंत्यविधी केला जातो.