रक्तद्रवाची प्रचंड टंचाई

    दिनांक :28-Mar-2021
|
नागपूर,
कोरोना उपचारास सहाय्यभूत रक्तद्रवाची (प्लाझ्मा) सध्या प्रचंड टंचाई जाणवत असून त्याअभावी अनेक बाधितांचा मृत्यू झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचे आगमन झाले. अशातच रक्तद्रव (प्लाज्मा) थेरपीने आशा जागविली. कोरोना संसर्ग झाल्यावर रुग्ण बरा होतो तो मुळात त्याच्या शरीरात प्रतिजैविके (अँटीबॉडीज) विकसित झाल्यानेच. लक्षणे असलेल्या कोरोना बाधिताची तो बरा झाल्यावर त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याच्या दोन आठवड्यांनंतर त्याच्या रक्तातून द्रव काढले जाते. ते बाधित रुग्णात सोडल्यास त्यास बरं होण्यास मदत होते.

ngp _1  H x W:
 
एका व्यक्तीकडून काढलेल्या रक्तद्रवामुळे २ बाधितांवर उपचार करता येतो तसेच चार आठवड्यांनंतर तो पुन्हा देता येऊ शकतो. सर्व कोरोनाबाधित गंभीर रुग्णांना २०० मिली एक दिवसाच्या अंतराने २ मात्रा द्यायला हव्यात. शासनाने महाराष्ट्रात ‘प्लाझ्मा थेरपी इन नोव्हेल कोरोना व्हायरस असेसमेंट 'प्रोजेक्ट प्लाटिना' २९ जूनपासून सुरू केला. रक्तद्रव दान करा, असे आवाहन शासनाने कोरोनामुक्तांना केले. त्यास प्रतिसाद मिळाला तरी तो पुरेसा नव्हता. शासनाने रक्तद्रव दान करण्याऱ्यास २ हजार रुपये देणेही सुरू केले. रक्तद्रव दिल्याने कोरोना सरसकट बरा होतो, हे सिद्ध न झाल्याच्या कारणावरून ‘प्रोजेक्ट प्लाटिना' बंद झाला. मात्र, अद्यापही रक्तद्रव उपचाराने कोरोना बरा होतो, किमान मृत्यू टळतो, असा ठाम विश्वास कायम आहे. त्यामुळेच आजही रक्तद्रवास मोठी मागणी आहे. असे असले तरी रक्तद्रवाची टंचाई जाणवतेय. तो न मिळाल्याने बऱ्याच बाधितांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. कोरोनाबाधितास रक्तद्रव देण्यासाठी रुग्णाचे नातेवाईक रक्तपेढ्यांंमध्ये पदरचे पैसे खर्च करताहेत. पण, रक्तद्रव दान करण्यात उदासिनताच जास्त आहे. तेथे पुन्हा संसर्ग होण्याची भीती व कडक निकष, या कारणाने रक्तद्रव दानासाठी कोरोनामुक्त मोठ्या संख्येने पुढे येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
 
मागणी पण टंचाई
लाईफ लाईन रक्तपेढीद्वारे मागील ६ महिन्यांत ३३०० पिशव्या रक्तद्रव दिला गेला. आजही साधारण रोज ३० ते ४० पिशव्या रक्तद्रव पुरवठ्याची क्षमता आहे. मात्र, विदर्भात आजही रक्तद्रवाची टंचाई आहे. नागपूर जिल्ह्यात सुमारे पावणेदोन लाख कोरोनामुक्त आहेत. त्यातील लक्षणे होते, अशांची संख्या मोठी आहे. अशा दात्यांनी निर्भयतेने पुढे यायला हवे, असे मत लाईफ लाईन ब्लड बँकेचे डॉ. हरिश वरभे यांनी व्यक्त केले.