कोरोना बाधितांवर उपचारासाठी खाजगी रुग्णालयातील खाटा अधिग्रहित

    दिनांक :28-Mar-2021
|
वाशिम,  
कोरोना बाधित रुग्णांना भरती करून महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत पात्र असणार्‍या रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी शहरातील 4 खाजगी रुग्णालयातील 116 खाटा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहेत.या आदेशानुसार वाशिम येथील डॉ. बिबेकर हॉस्पिटलमधील 40 खाटा (15 ऑक्सिजन खाटा), वाशीम क्रिटीकल केअर हॉस्पिटलमधील 16 (2 व्हेंटिलेटर व 12 ऑक्सिजन खाटा), डॉ. देवळे हॉस्पिटलमधील 40 (1 व्हेंटिलेटर व 21 ऑक्सिजन खाटा), लाईफ लाईन हॉस्पिटलमधील 20 ( 2 व्हेंटिलेटर व 10 ऑक्सिजन खाटा) खाटा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. या रुग्णालयांमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक आवश्यकतेप्रमाणे रुग्ण पाठविण्याची व्यवस्था करू शकतील.
 

corona _1  H x
 
या रुग्णालयांना ‘आयसीएमआर’ने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे तसेच महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे व मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करणे, उपचारासाठी लागणार्‍या तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचारी, अधिकारी वर्ग चोवीस तास नियमितपणे उपस्थित ठेवणे, रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या व्यक्तींची माहिती गोपनीय ठेवणे, तसेच रुग्णालयामध्ये पुरेशा प्रमाणात प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब टेक्निशियन), रुग्णवाहिका असणे बंधनकारक राहणार आहे.रुग्णालयाचे व्यवस्थापक यांनी रुग्णालयामध्ये विद्युत, पाणी व इतर आवश्यक सुविधा अखंडितपणे उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.
 
 
तसेच रुग्णालयामध्ये एक नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात यावी, नोडल अधिकार्‍यांची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांना देण्यात यावी. ज्या व्यक्ती निरीक्षणाखाली ठेवण्यात येतील त्या वैद्यकीय कक्षात यासंदर्भात काम करणारे हॉस्पिटलचे मनुष्यबळ व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्याशिवाय इतर कोणालाही प्रवेश राहणार नाही. तसेच याठिकाणी आलेल्या व गेलेल्या प्रत्येक व्यक्तींच्या आवश्यक नोंदणी ठेवणे बंधनकारक राहील. शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तींचे रुग्णालयामार्फत उल्लंघन झाल्यास सदरची परवानगी रद्द करून कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच सदर हॉस्पिटलचे क्षेत्र हे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.