‘शिवाजी’च्या आमसभेत विविध विषयांवर चर्चा

    दिनांक :28-Mar-2021
|
- पहिल्यांदाच झाली आभासी पद्धतीने
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
महाराष्ट्रातील दुसर्‍या क्रमांकाची शिक्षण संस्था म्हणून नावाजलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेची 143 वी आमसभा रविवारी प्रथमच आभासी पद्धतीने घेण्यात आली. कोरोनाचा विदर्भातील वाढता प्रादुर्भाव आणि संस्थेच्या आजीव सदस्यांचे वय लक्षात घेता सर्व सदस्यांना आपल्या किंवा गावानजीकच्या ठिकाणाहून आमसभेत सहभागी होता यावे म्हणून संस्थेने ‘झूम’अ‍ॅपवर घेतलेली ही पहिलीच आमसभा अत्यंत यशस्वीपणे पार पडली.
 
sadA_1  H x W:
 
संस्थेच्या मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून आमसभा सुरु झाली. संस्थेचे उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, डॉ. रामचंद्र शेळके, अ‍ॅड. गजानन पुंडकर, कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, प्राचार्य केशवराव गावंडे, केशवराव मेतकर, माजी न्यायाधीश अशोकराव ठुसे, सचिव शेषराव खाडे, स्वीकृत सदस्य डॉ. वि. गो. ठाकरे, नरेशचंद्र पाटील, डॉ. पी. एस. वायाळ, डॉ. अमोल महल्ले यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. भाऊसाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केल्यानंतर संस्थेच्या निधन झालेल्या आजीव सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व सभेच्या कामकाजास सुरुवात झाली. आमसभेचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सचिव शेषराव खाडे यांनी केले.
 
 
या आभासी सभेसाठी विदर्भातील बावीस केंद्रांवर आजीव सदस्यांना सभेत सहभागी करून घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे विविध केंद्रावर जवळपास अडीचशे आजीव सदस्य आमसभेत सहभागी झाले तर सुमारे पन्नास सदस्यांनी मोबाईल व घरच्या संगणकाद्वारे सभेत सहभाग नोंदवला. संस्थेच्या संगणक समितीच्या मार्गदर्शनात आजीव सदस्य अशोक देशमुख यांचे नातू शिवेंदू अभिजित देशमुख यांनी या आमसभेची तांत्रिक बाजू सांभाळली. या आभासी आमसभेसाठी संस्थेच्या सर्व शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. शिवाजी शिक्षण संस्थेने पहिल्यांदा केलेल्या या आभासी आमसभेच्या यशस्वी प्रयोगासाठी सर्व आजीव सदस्यांनी संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख व सर्व कार्यकारिणीचे अभिनंदन केले.