दुरांतोमध्ये चढण्याच्या प्रयत्नात निरीक्षक जखमी

    दिनांक :28-Mar-2021
|
नागपूर,
रेल्वेगाडीमध्ये चढण्याच्या प्रयत्नात अचानक पाय घसरल्याने गाडीखाली येता येता एक पोलिस निरीक्षक थोडक्यात बचावले. या घटनेत हे निरीक्षक किरकोळ जखमी झाले आहेत. राजेंद्र बाबू पवार असे या पोलिस निरीक्षकाचे नाव असून ते गणेशपेठ पोलिस ठाण्यात द्वितीय पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.
 
ngp _1  H x W:
 
शुक्रवारी रात्री 8.55 च्या सुमारास ही घटना घडली. घटनेच्या वेळी राजेंद्र पवार हे सुट्यांवर आपल्या गावी मुंबईला जात होते. त्यांचे 02190 नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेसमध्ये आरक्षण होते. गाडी सुटण्याच्या वेळेवर पवार हे धावतपळतच रेल्वेस्थानकावर पोहचले. कसेतरी ते होम पलाटावर पोहचले. तोच गाडी सुटली. गाडी पकडण्याच्या नादात त्यांनी एका डब्यात शिरण्याचा प्रयत्न केला. तोच पायदानावरून त्यांचा पाय घसरला आणि त्यांचा पाय फलाट आणि गाडीच्या मधात फसला. त्याच गाडीनेे रात्रगस्तीवर निघालेले रेल्वे सुरक्षा बलाचे जवान संजय खंडारे यांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी हात देऊन पवार यांना बाहेर काढले. तोपर्यंत काही अंतर ते फरफटत गेले होते. या घटनेत पवार यांच्या पार्श्वभागाला आणि पायाला मार लागला. पायलटच्या लक्षात हा प्रकार येताच त्याने गाडी थांबविली. त्याच्यांवर गाडीतच प्रथमोपचार करून त्यांना त्याच गाडीने मुंबईला रवाना केले. नशीब बलवत्तर म्हणून त्यांचा
जीव वाचला.
 
 
महिलाही बचावली
रेल्वेतून उतरण्याच्या प्रयत्नात वर्धा येथील वंदना डोंगरे (40) नावाची महिला रेल्वेखाली येण्यापासून थोडक्यात बचावली. डोंगरे यांची मुलगी 02036 रेल्वेने जाणार होती. मुलीला सोडण्यासाठी डोंगरे रेल्वेस्थानकावर आल्या होत्या. मुलीला घेऊन त्या एस 3 या डब्यात चढल्या. तोच गाडी सुटली. गाडीतून उतरण्याच्या प्रयत्नात त्या दारातून फलाटावर पडल्या. रेल्वेखाली येणार तोच फलाटावर उपस्थित आरपीएफ जवान निलेश पिंजरकर यांनी तिला ओढल्याने ती थोडक्यात बचावली.