गुलामी नको, शेतीला स्वातंत्र्य द्या : अ‍ॅड. शर्मा

    दिनांक :28-Mar-2021
|
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
शेतमालाला हमी भावाच्या संरक्षणाची मागणी करणे म्हणजे स्वतःहून पिंजर्‍यात बंदिस्त होऊ पाहणार्‍या पाळीव पोपटाने स्वातंत्र्य नाकारून स्वेच्छेने गुलामीची मागणी करण्यासारखे असल्याचे परखड मत स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अ‍ॅड. दिनेश शर्मा यांनी व्यक्त केले.
 
dvfaes_1  H x W
 
कोरोना आपत्तीमुळे आभासी पद्धतीने झालेल्या सातव्या अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या समारोपीय प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. भविष्यकाळात जागतिक स्तरावर अनेक स्थित्यंतरे येऊ घातली असून पुढील काळात भांडवलशाहीसह समाजवाद सुद्धा निष्प्रभ ठरणार आहेत. नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित उद्योजकतेला सुगीचा काळ येणार असून ज्या देशात जोखीम पत्करणारी तरुणाई निर्माण होत नाही त्या देशात कोणीही गुंतवणूक करायला पुढे येणार नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. उद्यमशील तरुणाईची जडणघडण करणे काळाची गरज असून त्यासाठी जिज्ञासा आणि परिवर्तनाची भूक वाढवणारे साहित्य निर्माण झाले पाहिजे, असेही अ‍ॅड. दिनेश शर्मा म्हणाले.
 
 
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष ललित बहाळे म्हणाले विज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र व तंत्रज्ञानाचे अध्ययन करून साहित्य निर्मिती करण्यासाठी मराठी साहित्य विश्वाने पुढाकार घेतला पाहिजे. शेतकरी केवळ कष्टकरी नसून शेतीमधला गुंतवणूकदार व बौद्धिक संपदेचा वापरकर्ता आहे. जोखीम पत्करून शेती करावी लागत असल्याने शेतकरी उद्योजक सुद्धा असल्याचे ते म्हणाले. राज्यात वाढलेला कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन सुधारित कार्यक्रमपत्रिकेनुसार आभासी स्वरूपात झालेल्या सात दिवसाच्या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे 26 रोजी सूप वाजले. याप्रसंगी अ‍ॅड. सतीश बोरुळकर यांचेही समयोचित भाषण झाले. संचालन सुधीर बिंदू यांनी तर ठरावाचे वाचन कार्याध्यक्ष गंगाधर मुटे यांनी केले.
 
 
यावेळी देशातील इतर नागरिकांप्रमाणे सुखाचे आणि सन्मानाचे जीवन जगता यावे, यासाठी शासनाने निर्णायक पावले उचलून शेतीवर झालेला अन्याय दूर करावा, शेतीविषयामध्ये रुची वाढावी व सर्वार्थाने नवीन उदयोन्मुख पिढीच्या शेतीविषयक जाणिवा प्रगल्भ व्हाव्यात म्हणून प्राथमिक, माध्यमिक शालेय आणि उच्च महाविद्यालयीन अभ्यासक्रमात शेतीसाहित्याचा प्राधान्यक्रमाने अंतर्भाव केला जावा, शेतकरी आत्महत्यांच्या कारणाचा शोध घेण्यासाठी राज्य शासनाने शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी, कृषी पत्रकार आणि शेतीसाहित्यिकांचा समावेश असलेली एक बहुआयामी अभ्यास समिती गठीत करावी, महात्मा ज्योतीराव फुले आणि युगात्मा शरद जोशी यांनी शेतीसाहीत्यात दिलेले सर्वोच्च योगदान लक्षात घेऊन राज्य शासनाने त्यांना शेती साहित्यरत्न सन्मान देऊन त्यांचा गौरव करण्यात यावा, शेतकरी नेते शरद जोशी यांच्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता करणारे आदर्श मॉडेल ठरेल असे युगात्मा स्मारक निर्माण केले जावे, आदी 7 ठराव पारित करण्यात आले.