- बाजारात भावच नाही
- नितीन दुर्बुडे
पथ्रोट,
कांदा बाजारात येताच दर पडतात आणि शेतकर्यांना तो कवडीमोल भावाने विकावा लागतो. हे गुंतागुंतीचे कोडे अजूनही शेतकर्यांना उमजले नाही. यावर्षी कांदा बियाण्याचे भाव जास्त असल्याने लागवड खर्च वाढला आणि आता कांद्याचे दर घसरल्याने उन्हाळी कांद्याने शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. शेवटी कांद्याने वांधा आणलाच.
अचलपूर, अंजनगावसह चांदुरबाजार तालुक्यात कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. दरवर्षी कांदा पिकास बाजारपेठेत कमी दर मिळाल्याने शेतकरी मेटाकुटीस येतो. मध्यंतरी कादा दर गगनाला भिडल्याने यंदा चांगले उत्पन्न मिळेल या अपेक्षेने शेतकर्यांनी कांदा लागवड केली. यावर्षी कांद्याला सुरवातीला चांगला भाव मिळाला; मात्र जेव्हा शेतकर्यांच्या घरात कांदा आला तेव्हा दर खाली घसरले. कांदा उत्पादक शेतकर्यांचा उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे. सोबत कांद्याचे बियाणेही महागले. दरवर्षी शेतकरी कांदा लागवडीसाठी पाचशे ते सहाशे रुपये पायलीने बी खरेदी करतात, मात्र यावर्षी एका पायलीसाठी दोन हजार ते तीन हजार रुपये मोजावे लागले. परिणामी कांदा लागवड खर्चात वाढ झाली.
उन्हाळी कांद्याला चांगला दर मिळेल या अपेक्षेने महागडे बियाणे खरेदी करत शेतकर्यांनी कांदा लागवड केली. गेल्या 10 ते 12 दिवसापासून राज्यात कांद्याचे दर कमी होत आहे. कांद्याचा सरासरी 1000 ते 1300 रुपये प्रति क्विंटल दर सांगितला जात आहे. याच कांद्याचा मागील 15 दिवसांआधी 2500 ते 3000 रूपये प्रति क्विंटल दर मिळत होता. बाजारभावात मोठी घसरण झाल्याने शेतकरीवर्गाचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. स्थानिक शेतकरी राजू किसन रसे म्हणाले की, यावर्षी महागडे बियाणे घेऊन कांदा लागवड करावी लागली. वातवरणाने साथ दिल्याने कांद्याचा दर्जा चांगला आहे. मात्र दिवसेंदिवस भाव कमी होत असलेल्याची चिंता वाटते. यंदा तरी भाव चांगला मिळावा हीच अपेक्षा आहे.