आगीत होरपळलेल्यांना दिला मायेचा ओलावा

    दिनांक :28-Mar-2021
|
- आदर्श संस्कार मंडळाची लक्कडगंज आगग्रस्तांना मदत
अकोला 
अकोल्यातील लक्कडगंज परिसरातील 5 मार्चची मध्यरात्र काहींच्या संसारांची राखरांगोळी करणारी ठरली. ताटी, बांबू, बल्ली, बासे आदी विकून उदरनिर्वाह करणारे डेहनकर कुटुंब या आगीत होरपळल्या गेले. जीवितहानी झाली नसली तरी उदरनिर्वाहाचे साधन असलेले दुकान भस्मसात झाले आणि लगतच निवारा असलेले घर राहण्या योग्य नव्हते. या संकटाने होरपळलेल्या कुटुंबांना येथील आदर्श संस्कार मंडळाने बंधुत्वाचे नाते जपत मदतीचा हात दिला. या मदतीनंतर आगीत होरपळलेले कुटुंबीय आदर्श संस्कार मंडळाच्या मायेच्या ओलाव्याने गहीवरले होते. 'लक्ष्मण स्मृति' ह्या आदर्श संस्कार मंडळाच्या कार्यालयात कौटुंबीक कार्यक्रमात 5 कुटुंब प्रमुखांना रा.स्व. संघाचे विभाग संघचालक प्रा. नरेंद्र देशपांडे, महानगर संघचालक गोपाल खंडेलवाल, संस्कार मंडळाचे अध्यक्ष विनोद देशमुख यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली.


me_1  H x W: 0
 
अकोल्यातील लक्कडगंज परिसरात 5 मार्चच्या मध्यरात्री अचानक आगीचे लोळ उठायला लागले. बसवेश्वर डेहनकर, प्रमोद डेहनकर, संदीप डेहनकर, गोपाल डेहनकर आणि अनुप रुईकर या पाच जणांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेली दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. काही क्षणात होत्याचे नव्हते झालेल्या या परिवारासमोर मोठे संकट उभे राहिले. उदरनिर्वाहाचे दुकान खाक झाले तर निवार्‍याची जागाही क्षतिग्रस्त झाली. या संकटात ‘विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया’ या ओळी प्रमाणे बंधुत्वाचे नाते जपत येथील आदर्श संस्कार मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आगीत होरपळलेल्या पाचही कुटुंबांची भेट घेतली आणि या संकटात आपण एकटे नसून आम्ही सर्व आपल्या पाठीशी भक्कम उभे आहोत याची ग्वाही दिली. एवढेच नव्हे तर या पाचही कुटुंबांना प्राथमिक गरजा भागविता याव्यात याकरिता आर्थिक मदत केली. ही आर्थिक मदत लाखमोलाची असून या मदतीच्या माध्यमातून आमच्या दुःखावर आदर्श संस्कार मंडळाने मायेची फूंकर घातली असल्याची भावना यावेळी आगग्रस्त परिवारांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे संचालन संस्कार मंडळाचे सचिव शशांक जोशी यांनी केले. कार्यक्रमाला रा.स्व.संघाचे महानगर कार्यवाह रुपेश शहा, अकोला अर्बन बँकेचे अध्यक्ष रामेश्वर फुंडकर, बाबासाहेब पाठक, माणिक नालट, चित्रा बापट यांच्यासह आदर्श संस्कार मंडळाचे विश्वस्त तथा गणमान्य नागरिक उपस्थित होते.