ट्रकवर आदळल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

    दिनांक :28-Mar-2021
|
- ट्रकचालकाला गतिरोधकच दिसले नाही
तभा वृत्तसेवा
टाकरखेडा संभू, 
समोर असलेले गतिरोधक न दिसल्यामुळे ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणारी दुचाकी ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून ही घटना रविवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास अमरावती ते परतवाडा मार्गावरील वायगाव फाट्यावर घडली. विजय किसनसिंग चव्हाण, रा. धारणी असे अपघातात मरण पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

df_1  H x W: 0  
 
एक ट्रक वलगाव येथून आष्टीकडे जात असताना विजय चव्हाण हे आपल्या दुचाकीने ट्रकच्या मागून येत होते. वायगाव फाट्यानजीक पहिल्या गतिरोधकावर पांढरे पट्टे नसल्याने सदर गतिरोधक ट्रकचालकाला दिसला नाही. त्यामुळे अचानक गतिरोधक समोर दिसताक्षणी ट्रकचालकाने ब्रेक मारला. याचवेळी मागून येणारी दुचाकी ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातात विजय यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक जावेद खान गुलाब खान रा. वलगाव याच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.
 
गतिरोधकावर पट्टेच नाही
 
वलगाव ते वायगाव दरम्यान रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक अपघातांच्या मोठ्या घटना घडलेल्या आहेत. विजय देखील याच रस्त्याच्या दुरावस्थेचा बळी पडलेला आहे. या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याने कित्येकदा वृत्तपत्राच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यानंतर या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली, परंतु या दुरुस्तीनंतर रस्त्यावर लावलेल्या गतिरोधकावर पांढरे पट्टे न मारल्याने येथे किरकोळ अपघाताच्या घटना घडत असतात. याचमुळे घटना घडल्याची चर्चा आता नागरिकांनी सुरू केली आहे,