कृष्णार्धांची रंगवेडी... 'धुळवड'

    दिनांक :29-Mar-2021
|
'रंगात रंगलेली ती रंगवेडी धुळवड, कुंकुवानी माखलेला तो वळणावरचा पळस, रंगाचा तोच धुरळा उठला मनीं नभाच्या, तशाच रंग लहरी उठल्या मनात वेड्या' 'रंगपंचमी'... उच्चारताच मनःपटलावर रंगाची उधळण सुरू होऊन मूर्तीमंत प्रेमाची, त्यागाची, समर्पणाची मूर्ती असलेली राधाच उभी राहते.
तसाच पटकन मनात जागतो तो श्रीकृष्ण! अन् मन रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या झुल्यावर झुलत ओठावर ओळी रेंगाळतात..
'जो हे अलबेला मद नैनो वाला जिसकी दिवानी ब्रिज की हर बाला...'
राधा-कृष्णाच्या प्रेमाचा दुवा असलेली गोड, मधुर, अवीट गोडीची 'राधाधून' म्हणजे बासरीनादच जणू! ती धून ऐकताच सृष्टीवर नवरंगांची चादर अंथरुन कृष्णमयी झालेली राधा, श्रीकृष्णाच्या भेटीच्या आशेने रंगात न्हाऊन धुंद नाचत असते आणि रंगीन ओळी दरवळतात.
 

holi_1  H x W:  
 
'आया होली का त्योहार उडे रंगो की बौछार,
तू है नार नखरेदार मतवाली रे..'
नजरेसमोर दोन शरीर एक जान असलेले, रंगांनी रंगलेले, प्रेमवेडे राधाकृष्ण उभे राहतात.
असं वाटतं इंद्रधनुतील सप्त रंगांच्या अनेक शृंगारित रंग लहरींनी राधा कृष्णांची रंगपंचमी अमर केली आहे ...
तजेलदार, बहारदार वसंतऋतू चे मखमली रंग कृष्ण उधळतो आणि मृगाक्षी राधेच्या गौरकांतीवर उधळलेल्या सप्त रंगांचा उत्सव पाहतो आणि मग त्या ओघवत्या ओळी आठवतात ...
'धरती है लाल आज अंबर है, लाल उडने दे गोरी गालों का गुलाल'....अप्रतिम... 'नवरंग' चित्रपटामधे राधा-कृष्णांची भूमिका रंगतदार रंगवली होती अभिनेत्री संध्या ने!
अशा रंगीन वातावरणात निसर्गाने बहाल केलेल्या नैसर्गिक रंगीबेरंगी फुलांच्या पाकळ्यांचे मोहक हार घातलेली, हळदीच्या रंगाची कर्णफुले घातलेली, हरित
मेहंदीच्या पानांचा रंग तळहातावर सजवलेली, आकाशासवे स्वतःचे प्रतिबिंब पाण्यात बघून कृष्णरंगात न्हाहलेली, सूर्याच्या सोनेरी, तलम किरणांचा सुवर्ण साज घातलेली राधा जणू इंद्रधनु ल्याली की काय? असं भासवतं अन् नकळत आपलं ही तरूण मन चिंब अगदी चिंब भिजलं जातं रंगांनी!
श्रीकृष्ण आणि राधेमध्ये रंगलेल्या रंगपंचमीची आठवण मनावर राज्य करते. एका वेगळ्याच विश्वात रमून जातो आपण! त्यांचे एकमेकांत विलीन होणे, राधेच्या अध्यात्मिक प्रेमाने तिचे कृष्णश्वासात रमणे आणि ह्रदय आणि आत्म्याचे मिलन होणे. सारे सारे काही अद्वैतापलीकडले! श्रीकृष्णाचे लाल रंगांनी राधेला शिकविलेले त्यागाचे धडे , हिरव्या रंगांनी कृष्णाच्या प्रेमाने दिलेली समृद्धी, पिवळ्या रंगाने खुललेली तिची कोमल, तजेल कांती आणि प्रेमाचा चढलेल्या गुलाबी रंगांच्या छटा आणि दिलेली ग्वाही... किती अवर्णनीय रंगपंचमी असेल ना!
अभिनेत्री संध्याने आणि अभिनेता महिपाल यांनी नवरंग या चित्रपटात 'अरे जा रे हट नटखट ना...' या गाण्यात राधा-कृष्णाच्या प्रेमाचे सांकेतिक रूप दर्शवले. राधा आणि कृष्ण वेगळे नाहीच..गाण्याच्या शेवटी एकमेकांत रंगलेले आणि एकरूप झालेले दिसले....दिव्यप्रभा जणू!
म्हणावसं वाटतं....
'कृष्णार्धा हे नसे वेगळे
दिव्यज्योत हे नाते तुमचे
सुगंध का हा फुलामधुनी
कधी कुणी काढला?'...
अशा ओळी सहज गुणगुणाव्या वाटतात..
निसर्गाने स्वतःच्या रंगांनी आपल्या जगण्यातल्या आनंदाचे, रसिकतेचे रंग कायम केले ह्रदयात...हो ना..
मखमली रंगाचे, नक्षी काढलेले, रेशीम पांघरलेले भिरभिरेणारे मनाचे फुलपाखरू आनंदाचे परागकण वेचायला आतुर असतात. आपण ठरवलं तर आपल्या जीवनात रंगांचा कुंचला उचलून मनात असलेलं सुरेख स्वप्नातील चित्रात प्रेमाचे, त्यागाचे आणि भक्तीचे, एकत्वाचे, मैत्रीचे, भावनांचे रंग भरून जीवन रंगतदार बनवू शकतो.
हा उत्सव जीर्ण झालेल्या सृष्टीला नवजीवन, नूतनीकरण करून नव्या वर्षाच्या स्वागताला सज्ज राहायला शिकवतो. तद्वतच आपण पण नकारात्मकता मिटवून पुन्हा नव्याने कसे आयुष्य फुलवायचे हे निसर्गाकडूनच शिकले पाहिजे.
रंग तर आपल्या दैनंदिन जीवनात घडणार्‍या प्रत्येक गोष्टीच्या नवचैतन्याचं प्रतिक आहे.
रंगांकडून आनंदाचे धडे शिकून जीवनात चैतन्य उतरवणं
रंगाकडूनच शिकायला हवंय..
बघा ना! सूर्यास्ताला आकाशात नवविध रंगांची उधळण करून रविराज अस्ताला जातो. त्या गुलाबी, केशरी, निळा, तांबड्या रंगाने ती संध्याकाळ भारलेली असते. धरा आणि आकाशाच्या मिलनाचे साक्षीदार सूर्यच असतो. ते बघताना नकळतपणे संध्याछाया आपल्या मनात आठवणींच्या वेगवेगळ्या फुलांनी रंगपंचमी साजरी करत असतात. नकळत त्या वाटेवर चालताना हळूहळू छाया गडद होऊ लागतात आणि एक टीमटीमणारी चांदणी चमकायला लागते. साऱ्यांचेच लक्ष वेधणारी, मनाला सुखद प्रकाश देणारी, हळूहळू चंद्रावर जाऊन प्रेमाचं राज्य करणारी एक चटकदार चांदणी..जणू
तळ्याकाठी चंद्राचं चांदणं लेवून नटलेली राधाच ती, कृष्णाच्या पायाशी लीन होऊन सर्वस्व भक्तीरूपी अर्घ्य देत असताना तळ्यातल्या चंदेरी पाण्यात प्रतिबिंबित झालेली प्रेममूर्ती भासते..हळुवार सुगंधित झुळकेनी चंदेरी पाण्यावर तरंग उठतात अन् कायेची सावली बनून विरघळून जातात, ती चंदेरी किरणांची पाण्यावर चमचमणारी चंदेरी फुले उमलली की तसा सगळा आसमंत चंदेरी सुंगधानी महकलेला अनुभवास येतो. जणू अवघा रंग एकचि झाला, रंगी रंगला श्रीरंग..... अन् सारे क्षण सुगंधित होतात.
सुचित्रा बाकरे