नागपूर प्रादेशिक विभागांतर्गत येणार्या कार्यक्षेत्रातील महामार्गावर मागील चार वर्षांमध्ये 4 हजार 993 लोकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. महत्वाचे म्हणजे, ट्रकद्वारे सर्वाधिक अपघात झाले असून यात 175 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे.
सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत महामार्ग पोलिस नागपूर प्रादेशिक विभागाकडे विविध प्रश्नांची विचारणा केली होती. याला उत्तरादाखल विभागाने सांगितले की, 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2020 या चार वर्षांमध्ये झालेल्या 6036 अपघातांमध्ये 4993 लोकांचा मृत्यू झाला आहे. 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 या वर्षभरात 891 पुरुष, 108 महिला तर 40 मुले अपघातात मृत्यू पावले आहेत. महामार्गावरील ट्रक अपघातात सर्वाधिक 175, कार अपघातात 140, बस अपघातात 26 तर इतर वाहनांनी 664 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. या चार वर्षांमध्ये झालेल्या अपघातांमध्ये 10 पोलिसांचाही समावेश आहे, अशी माहिती महामार्ग पोलिस नागपूर प्रादेशिक विभागाने दिली.