एकरा ऑटोमोबाईल दुकानाला आग

    दिनांक :30-Mar-2021
|
- आगीत 7 लाखांचा माल भस्म
- शहरात आगीच्या तीन घटना
नागपूर,
रंगपंचमीच्या दिवशी शहरात आगीच्या तीन घटना घडल्या. दोसर भवन चौक, सीए रोडवरील एकरा ऑटोमोबाईल अ‍ॅण्ड एसेसरीजच्या दुकानाला काल सकाळी अचानक आग लागली. अग्निशमन विभागाच्या पथकाने पाण्याचा फवारा करून ही आग आटोक्यात आणली. या आगीत 7 लाखांचा माल जळून खाक झाला. आगीचे कारण मात्र कळू शकले नाही.

ngp_1  H x W: 0 
 
महानगरपालिका प्रशासनाने काल रंगपंचमीच्या दिवशी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढले होते. किराणा, दूध, भाजीपाला आणि मासं विक्री दुकाने दुपारी 1 वाजेपयर्र्तच सुरू ठेवण्यास परवानगी होती. रंगपंचमी साजरी करू नका, असे आदेश महानगरपालिका प्रशासनाने दिले असले तरी शहरातील काही भागात रंगोत्सव साजरा करण्यात आला. सेंट्रल एव्हन्यू रोडवरील दोसर भवन चौकातील एकरा ऑटोमोबाईल अ‍ॅण्ड एसेसरीज दुकानाला काल सकाळी अचानक आग लागली. यासंदर्भात मनपाच्या अग्निशमन विभागाला माहिती मिळताच अग्निशमन जवान सकाळी 8.40 वाजता घटनास्थळी दाखल झाले. या विभागाची 8 वाहने घटनास्थळी पाठविण्यात आली. पंपाद्वारे पाण्याचा फवारा करून ही आग विझविण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच महापौर दयाशंकर तिवारी, अग्निशमन समितीचे माजी सभापती अ‍ॅड. संजयकुमार बालपांडे, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. या ऑटोमोबाईल दुकानात मोठ्या प्रमाणावर प्लॉस्टिक, ऑटोमोबाईल स्पेअर पार्टसचा साठा होता. या आगीत सुमारे 7 लाखांचा माल भस्म झाला. 2 लाख किमंतीचा माल वाचविण्यास अग्निशमन जवानांना यश आले. दुसरी आगीची घटना गणेशपेठ बसस्थानक येथील पार्सल कार्यालयात घडली. आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षाला सकाळी 9.30 वाजता देण्यात आली. याठिकाणी 3 अग्निशमन विभागाचे बंब पाठविण्यात आले. पाण्याचा फवारा करून ही आग आटोक्यात आणण्यात आली. आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
 
 
तिसरी घटना फेटरीत
फेटरी येथील जिनिंग मिलच्या युनिक ट्रेनिंग कंपनीतही काल दुपारी आग लागली. अग्निशमन विभागाला याबाबतची माहिती मिळताच 4 गाड्या घटनास्थळी पाठविण्यात आल्या. यात मनपा अग्निशमन विभागाची एक, वाडी नगरपरिषद येथून एक, कळमेश्वर येथून 1 तर मोहपा येथून 1 अग्निशमन गाड्याचा समावेश होता. विशेष म्हणजे याठिकाणी पाण्यासह आग प्रतिबंधात्मक उपाययोजना कुठलीच नव्हती. हा जिनिंग मिलचा परिसर असून याठिकाणी कापूसाची साठवणूक मोठ्या प्रमाणात केली जाते. अग्निशमन अधिकारी राजेंद्र दुबे, राजकुमार यादव, शंभरकर यांच्या नेतृत्वात आग विझविण्यात आली. आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.