रेड्डींना आरोपी करण्यासाठी भाजपा आक्रमक

    दिनांक :30-Mar-2021
|
- मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालयात आंदोलन
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
हरीसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात बदली करण्यात आलेले अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना सहआरोपी करून त्यांचे निलंबन करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी भाजपाने आक्रमक भूमिका घेत मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्यालतात आंदोलन केले. या आंदोलनामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

amrf_1  H x W:  
 
भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी व प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांच्या नेतृत्वात हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. आमची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रभारी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण आणि उपवनसंरक्षक खैरनार यांना दलनाबाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेत भाजपा कार्यकर्त्यांनी वनाधिकार्‍यांच्या दालनात ठिय्या मांडला आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली. वातावरण तापत असल्याचे लक्षात येताच प्रवीण चव्हाण यांनी पोलिस अधीक्षक हरी बालाजी यांना फोन करून रेड्डींविरोधात काही अहवाल असेल तर पाठवा, अशी विनंती केली. आक्रमक असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी हरी बालाजी यांच्यावर देखील आरोप केले. शिवकुमार यांना पोलिस कोठडीत अतिशय सन्मानाची वागणूक मिळत असल्याचा आरोप केला. त्यानंतर प्रवीण चव्हाण यांच्या भ्रमणध्वनीवरून भाजपा प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी आणि जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांनी वनबल प्रमुख व्ही. साई प्रसाद यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याकडे सुद्धा हीच मागणी करण्यात आली. साई प्रसाद उडवाउडवीचे उत्तर देत असल्याचा आरोप करून भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जिल्ह्यात इतकी गंभीर घटना घडली असताना राज्याच्या महिला व बाल विकासमंत्री यशोमती ठाकूर आणि राज्यमंत्री बच्चू कडू बेपत्ता आहेत असा सवाल निवेदिता चौधरी यांनी केला. सदर आंदोलनात भाजपा गटनेता प्रवीण तायडे, राजेश पाठक, मनिष मेन, समीर हावरे, अर्चना पखान यांच्यासह भाजपाचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दंगा नियंत्रण पथक आणि अग्निशामक दलाला देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.
 
 
यशोमती व बच्चू यांच्या प्रतिमा जाळल्या
दीपाली आत्महत्या प्रकरणात चुप्पी साधून बेपत्ता झाल्याचा आरोप करून भाजपाने पालकमंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह एम. एस. रेड्डी यांच्या प्रतिमांचे मेळघाट वाघ्र प्रकल्प कार्यालयाच्या परिसरात दहन केले.
 
 
यशोमतींची धडपड श्रेयासाठी : कुळकर्णी
दीपाली आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत कोणतीच ठोस भूमिका न घेणार्‍या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी घाईगडबडीत मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन घटनेची सखोल चौकशी व रेड्डी यांना निलंबित करण्याची मागणी केली. हा सर्व प्रकार आयत्यावेळी श्रेय घेण्याचा आहे. ही धडपड केविलवाणी असल्याचा आरोप, शिवराय कुळकर्णी यांनी केला.