मेळघाटात फगवा मागण्यास सुरवात

    दिनांक :30-Mar-2021
|
- लोकनृत्याची पर्वणी आदिवासींची परंपरा
तभा वृत्तसेवा
पथ्रोट, 
सलग पाच दिवस उदरनिर्वाहाच्या कामांना कात्री लावून आदिवासी बांधव होळीच्या रंगात न्हाऊन निघतात. सातपुडा पर्वत रांगाच्या कुशीत वसलेल्या मेळघाटातील होळीचा उत्सव आजही परंपरेनुसारच होत असतो. शहरात येणार्‍या मोठ्या लोकांचा रस्ता अडवून त्यांना फगवा म्हणजे पैसे मागण्याची अनेक वर्षाची मेळघाटात परंपरा आहे. त्या उत्सवाला आता कुठे सुरूवात झाली आहे. मेळघाटातील होळीस पूर्वसंध्येपासून या सणाला खर्‍या अर्थाने सुरवात होते. रोजगारासाठी भटकंती करणारा आदिवासी बांधव होळीसाठी मात्र आपल्या गावी परत येत असतो. पहिल्या दिवशी शेतातील पीक व होलिकाचे पूजन केले जाते. एकाच दिवशी सर्व गावात होलिका दहन होत नाही. वेगवेगळ्या दिवशी होळी पेटविल्या जाते. पहिल्या रात्री गावाबाहेरील मोकळ्या जागेवर आदिवासी नृत्य करत असतात.

as_1  H x W: 0  
 
मेळघाटात आदिवासी बांधवांची संख्या सर्वाधिक असून यात कोरकू, राठे, बलीया, गवलान, गोंड या जातीचा समावेश आहे. सर्वाधिक कोरकू समाज मेळघाटात वास्तव्यास आहे. आदिवासींचा होळी हा अंत्यत महत्त्वाचा सण आहे. जवळजवळ आठवडाभर होळी साजरी केली जाते. नवीन वस्त्र परिधान करून ढोल व बासरीच्या तालावर आदिवासी महिला व बांधव नृत्य सादर करतात. या ठिकाणी फगवा (पैसै) मागण्याची परंपरा आहे. यादरम्यान फगवा मागण्यासाठी गावबंदी केली जाते. शहरी माणसाला फगवा मागितला जातो. होळी संपूर्ण पेटल्यानंतर आदिवासी बांधव कोरकू मुठवा देवाजवळ एकत्र जमतात. मुख्य मार्गावर आडवा दोर धरुन स्त्रीया पुरुषांना अडवून फगवा मागतात. फगवा मिळाल्याशिवाय रस्ता सोडत नाहीत. याही वेळी स्त्री-पुरुष विशिष्ट प्रकारची गीते गात नृत्य करत असतात. याला होरयार नृत्य असे म्हणतात. त्यानंतर पुरुष मंडळी एका भांड्यात पैसे टाकतात. यालाच फगवा असे म्हणतात. त्यानंतर पुरुषांना जाण्यासाठी रस्ता दिला जातो. गावपाटलाच्या भेटीला हे सर्व लोक जातात. भोजनानंतर मुठवा देवाजवळ रात्रभर आदिवासी बांधव नृत्य करत असतात. होळी आदिवासींसाठी महत्वाचा सण मानल्या जातो.