चोख बंदोबस्त असुनही होळीला लागले गालबोट

    दिनांक :30-Mar-2021
|
- तलवारीने भोसकून मित्राचा खून
नागपूर, 
होळीनिमित्त शहरात चोख पोलिस बंदोबस्त असुनही शेवटी गालबोट लागलेच. जुन्या वैमनस्यातून झालेल्या वादावादीत कॉटन मार्केटजवळील मोेक्षधाम येथे एकाचा तलवारीने भोसकून खून करण्यात आला तर अजनी हद्दीत जयभीमनगरात एकाला चाकूने भोसकून जखमी करण्यात आले.

nngp _1  H x W: 
 
लखन पप्पू गायकवाड (32) तकिया, धंतोली असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. लखन हा मोक्षधाम येथे सुलभ शौचालाय चालवितो. त्याचप्रमाणे त्याच्याकडे पार्किंगचा देखील ठेका आहे. आरोपी चेतन उर्फ बाबा मंडल (कौसल्यानगर) याचा मोक्षधामजवळच पानठेला आहे तर दुसरा आरोपी तन्मय उर्फ भद्दया नगराळे (30) हा त्याच परिसरात मालवाहू मिनीट्रक चालवितो. काही दिवसांपासून दोन्ही आरोपींचे लखनसोबत वाद सुरू होता. सोमवारी सायंकाळी 6 च्या सुमारास होळीनिमित्त तिघेही मोक्षधाम घाटाजवळ दारू पित बसले होते. दरम्यान, जुन्या वादातून त्यांचे भांडण झाले. या भांडणात आरोपी बाबा आणि बद्दयाने तलवारीने लखनवर वार करून त्याचा जागीच खून केला. लखन मृत झाल्याचे समजताच दोन्ही आरोपी घटनास्थळाहून पळून गेले. गणेशपेठ पोलिसांना ही माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली.
 
 
खुनाचा प्रयत्न
दारू न पाजल्याच्या कारणावरून वाद झाल्याने एकाला चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना जयभीमनगर गल्ली नं. 1 येथे घडली. तरुण मंगेश रंगारी (19) आणि त्याचा भाऊ साहिल मंगेश रंगारी (22) यांना वडील नसून आई आहे. मिळेल ते काम करून ते आपली उपजिविका करतात. सोमवारी दुपारी 2.30 च्या सुमारास तरुण हा आपल्या घरी हजर होता. त्यावेळी त्याचा मित्र प्रतिक सुनील खोब्रागडे (21) कुकडे ले आऊट हा तरुणच्या घरी आला. प्रतिकने तरुणला दारू पाज असे म्हटले. तरुणने नकार दिला. त्यावरून त्यांच्यात वाद होऊन लांबाझोंबी झाली. या लांबाझोंबीत तरुणच्या हातातील कडे प्रतिकच्या डोक्याला लागला. त्यानंतर दोघेही आपआपल्या घरी गेले.
 
काही वेळातच प्रतिक हा त्याचा भाऊ ऋतिक यास घेऊन तरूणच्या घरी आला. त्यावेळी त्याचा भाऊ साहिल हा पलंगावर झोपला होता, तर तरुण स्वयंपाकखोलीत होता. तरुण समजून खोब्रागडे बंधूंनी साहिलवर चाकूने हल्ला चढविला. त्याचप्रमाणे तरुणच्या मांडीवर चाकूने वार केला. साहिलच्या आईने आरडाओरड केल्याने आजूबाजूचे लोक धाऊन आले. गंभीर अवस्थेत साहिलला मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. याप्रकरणी अजनी पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली.