पहाडाचे नंदनवदन करणारा ध्येयवेडा अण्णा

    दिनांक :30-Mar-2021
|
- नगर परिषदेचा कर्मचारी
तभा वृत्तसेवा
दारव्हा, 
येथून नेर डोल्हारी मार्गावर 2 किमी अंतरावर नगर परिषदेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे हा परिसर जंगली भागात असून नपद्वारे शहरातील जनतेला शुद्ध पाणी मिळण्याकरिता कर्मचारी यांची नेहमीच धावपळ असते. या ठिकाणी दिवसा व रात्री पाच कर्मचारी आपली कामे करतात.
 
yt4_1  H x W: 0
 
या पाचपैकी सूत्रसेन वामन भितकर हा ध्येयवेडा कर्मचारी असून त्यांनी आपल्या कर्तव्यासोबतच स्वखर्चाने पहाडावर नंदनवन फुलविण्याचा जणूकाही चंगच बांधलेला दिसतो. या ओसाड पहाडवर वनराई फुलविणे किती महत्वाचे आहे हे त्यांनी केलेल्या हिरवळीवरून लक्षात येते. आज त्या ठिकाणी आपला काही वेळ घालवावा असे अनेकांना वाटते. ओसाड पाहाडाचे सौंदर्यीकरण करताना विविध प्रकारचे फळझाडे त्यामध्ये आंबा, चिक्कू, पेरू, डाळिंब, फणस, मोठ्या झाडांमध्ये वड, पिंपळ, कडुनिंब, औदुंबर, भाजी प्रकारांमध्ये वांगे, टमाटे, मेथी, सांबार यांची लागवड केली.
 
 
खरोखरच सूत्रसेन भितकर यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांना या कार्यास नगर परिषद अध्यक्ष बबन इरवे, उपाध्यक्ष प्रीती बलखंडे, मुख्याधिकारी धीरज गोहाड यांचे सहकार्य लाभते. पाणीपुरवठा सभापती प्रकाश दुधे यांनी पाईपची व्यवस्था करून दिली. त्यामुळे झाडांना पाणी देणे सहज शक्य होते असे ते म्हणाले. सर्वांना हवेहवेसे सूत्रसेन वेगवगळे छंद जोपासतात. त्यांना सर्व मित्रपरिवार अण्णाजी या नावाने ओळखतात. पहाड सौंदर्यीकरणासोबतच आपल्या कर्तव्याव्यतिरिक्त फावल्या वेळात आरोग्याची काळजी घेत रोज शरीराचा सराव करतात. फुटबॉल हा त्यांचा आवडता खेळ असून चैतन्य ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी धावण्याच्या राष्ट्रीय व राज्य स्पर्धा जिंकल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सिंगापूर येथे जायचे होते. परंतु आर्थिक अडचणीमुळे जाऊ शकलो नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. प्रत्येकाने एखादा छंद नक्की जोपासावा हेही सूत्रसेन भितकर यांनी यावेळी आवर्जून सांगितले.