अखेर श्रीनिवास रेड्डी निलंबित

    दिनांक :30-Mar-2021
|
- शिवकुमारची कारागृहात रवानगी
- दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण
तभा वृत्तसेवा
अमरावती,  
हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्रसंचालक तथा अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांना मंगळवारी निलंबित करण्यात आले. यापूर्वी त्यांची याच प्रकरणात बदली करण्यात आली होती. रेड्डी यांना निलंबित करून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपासह विविध पक्ष व संघटनांनी लावून धरली होती. या प्रकरणात सातत्याने दबाव वाढत होता. त्याची दखल घेऊन महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंगळवारी भेट घेतली. रेड्डी यांच्या निलंबनाचा मुद्दा त्यांनी रेटून धरला. अखेर मुख्यमंत्री कार्यालयातून विशेष बाब म्हणून रेड्डी यांच्या निलंबनाचे आदेश निर्गमित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
 

reddy _1  H x W
 
आता रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल होणार की नाही, या बाबत सध्या काही स्पष्ट करण्यात आलेले नाही. दीपाली प्रकरणात यापूर्वी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. त्याच दिवशी त्यांना निलंबितही करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची पोलिस कोठडीत रवानगी केली होती. या प्रकरणाचा तपास पोलिस उपअधीक्षक पूनम पाटील करीत आहे. रविवारी त्यांनी शिवकुमार यांच्या चिखलदरा येथील कार्यालयाची व घराची झडती घेतली. तसेच कोठडीत चौकशी केली. दरम्यान शिवकुमार याची सोमवारी पोलिस कोठडीची मुदत संपली होती. न्यायालयाने पुन्हा एक दिवसाने ती वाढवून दिली होती. मंगळवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालायने शिवकुमारची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.