खोब्रामेंढा जंगलात चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा

    दिनांक :30-Mar-2021
|
गडचिरोली,
नक्षली कारवायांनी ग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दलाला मोठे यश आले आहे. पोलिसांनी एका कुख्यात नक्षलवाद्यासह इतर 4 नक्षलवाद्यांचा खात्मा केलाय. ही चकमक काल सोमवारी (ता. २९) सकाळी सात वाजताच्या दरम्यान घडली. मृतांमध्ये भास्कर या कुख्यात नक्षलवाद्या चा समावेश आहे. भास्कर हा 2019 च्या कुरखेडा भुसुरुंग स्फोटात 15 जवानाच्या हत्येचा कटात मुख्य भूमिकेत होता. सध्या भास्कर माओवाद्यांच्या दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य आणि माओवाद्याच्या दक्षिण गडचिरोली विभागीय समितीचा सदस्य आहे. भास्करचा मृत्यू माओवादी चळवळीसाठी मोठा हादरा आहे. मृतकामध्ये टिपागड दलमचा उपकमांडर सुखदेव नैतामचाही समावेश असून प्लाटून पंधराची सदस्य असलेल्या सुजाता गावडे याचाही मृतकामध्ये समावेश  आहे. मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये 3 पुरुष तर 2 महिलांचा समावेश आहे. या पाचही जहाल नक्षलवाद्यांविरोधात गंभीर गुन्हे दाखल असून त्यांच्यावर एकूण 43 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. पोलिसांच्या या कारवाईमुळे नक्षलवाद्यांचे धाबे दणाणले आहे.

nax _1  H x W:  
 
शस्त्रसाठा, नक्षली साहित्य जप्त
गडचिरोली येथील एका जंगलात नक्षलवादी ठाण मांडून बसल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरु केल्यानंतर पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरु झाली. यावेळी या चकमकीत जहाल असे एकूण 5 नक्षलवादी ठार झाले. यामध्ये एकूण 3 पुरुष तर दोन महिला आहेत. नक्षलवाद्यांसोबत चकमक झाल्यानंतर या भागात पोलिसांनी शोधमोहीम राबवली. या मोहिमेत पोलिसांना या नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. मिळालेल्या माहितीनुसार या चकमकीत आणखी 4 नक्षलवादी जखमी झाल्याची शक्यता आहे. यावेळी मृत नक्षलवाद्यांकडून पोलिसांनी शस्त्रांसह मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जमा केले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटलेली असून या पाच नक्षलवाद्यांवर तब्बल 43 लाख रुपयांचे बक्षीस सरकारने जाहीर केले होते.
nax _1  H x W:
 
एका नक्षलवाद्यावर खूनचे 41 गुन्हे दाखल
नक्षलवाद्यांशी चकमक झाल्यानंतर सी-60 जवानांनी जंगल परिसरात शोधमोहीम राबवली. यामध्ये मृत्यू झालेल्या एकूण 5 पैकी एका कुख्यात नक्षलवाद्याचाही खात्मा झाल्याचे पोलिसांना समजले. या नक्षलवाद्याचे नाव रुषी रावजी ऊर्फ पवन ऊर्फ भास्कर हिचामी असे आहे. तो टिपागड एलओएस पदावर कार्यरत होता. याच्यावर एकूण 155 गुन्हे दाखल असून यातील 41 गुन्हे हे खुनाचे आहेत. इतर गुन्ह्यांमध्ये चकमक-78 दरोडा- 1 जाळपोळ-16 आणि इतर 19 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. शासनाने या नक्षलवाद्याला पकडून देण्यासाठी एकूण 25 लाखांचे बक्षीस ठेवले होते. दरम्यान, गडचिरोलीसारख्या भागावर नक्षलवाद्यांचा मोठा पगडा आहे. येथे नक्षलवादी जाळपोळ, दरोडे, खून अशा प्रकारचे गुन्हे सर्रास करतात. त्यामुळे सध्या येथील पोलीस दलाने केलेली ही कारवाई म्हणजे विशेष यश असल्याचे म्हटले जात आहे.