होळीवरून राणा दाम्पत्याविरूद्ध वातावरण पेटले

    दिनांक :30-Mar-2021
|
- ‘त्या’ अधिकार्‍यांच्या प्रतिमांना चपलांचा हार
- होळीचाच अपमान झाल्याचा आरोप
तभा वृत्तसेवा
धारणी,
डिजिटल ग्राम हरिसाल येथे होळीत शिवकुमार व श्रीनिवासन रेड्ड्ीच्या प्रतिमेला चप्पलांचा मारा करणार्‍या व होळीवरच चपलांचा हार बांधणार्‍या युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध तथा खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा विरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी लावला आहे. मन्नालाल दारसिंबे यांनीही जनआंदोलनाचा इशारा, तर पटेल यांनी गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्याने दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता खासदार व आमदाराचा मेळघाटात राजकीय खेळ सुरू झालेला आहे.
 
sfs_1  H x W: 0
 
हरिसालच्या शासकीय निवासस्थानी वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाणने सरकारी पिस्तुलने आत्महत्या केल्यावर सर्वत्र हळहळ व्यक्त होऊन डीएफओ शिवकुमार व श्रीनिवास रेड्ड्ी विरुद्ध जोरदार जन असंतोष पसरलेला आहे. जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या समक्ष कार्यकर्त्यांनी हरिसालच्या होळीत शिवकुमार रेड्ड्ीच्या प्रतिमेला चपला मारल्या होत्या. खा. नवनीत राणा यांनी होळी पेटवलेली होती. यावेळी शिवकुमार व रेड्ड्ी मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. दिपाली चव्हाण अमर रहे च्या घोषणा पण कार्यकर्त्यांनी दिल्या. होळीत लावलेल्या प्रतिमेवर चपला मारण्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर झळकताच आमदार राजकुमार पटेल यांनी खासदार-आमदारांच्या या कृत्याचा तीव्र निषेध करुन एफआयआर दाखल करण्यासाठी वैधानिक सल्ला घेण्याच्या हालचाली सुरू केल्याने आता खासदार-आमदाराचा पश्चिम बंगालमधील सध्याच्या वातावरणासारखाच ‘राजकीय खेला होबे’ सुरू झाला, असे बोलल्या जात आहे.
 
 
महाराष्ट्र जन क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मन्नालाल दारसिंबे यांनीही खासदार नवनीत राणा यांनी आदिवासींच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल विरोध नोंदविताना आंदोलनाची धमकी दिलेली आहे. एका माहितीनुसार मेळघाटातील अनेक आदिवासी संघटना याविषयी दखल घेवून निषेध करण्याच्या तयारीला लागलेल्या आहेत. दरम्यान खा. नवनीत राणा व आमदार रवी राणा हे युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांसोबत गेल्या तीन दिवसांपासून तब्बल 150 गावात फिरत आहेत. त्यांचा उत्साह मात्र या घटनेमुळे काही कमी झालेला दिसत नाही. दिपाली आत्महत्या प्रकरण आता पुढे कसे व कोणते वळण घेईल हे सांगणे कठीण आहे. दरम्यान, शिवसेनेचे तालुकाप्रमुख साधुराम शंकरजी पाटील व कार्यकर्ते यांनी नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या विरुद्ध या प्रकरणी चिखलदरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
 
 
आदिवासींचा अपमान झाला
होळीला चपलेने मारून अपमानित केल्याने आदिवासींच्या भावना दुखावल्या आहेत. आपले राजकारण चमकविण्यासाठी खासदार, आमदार पदावर विराजमान राणा दाम्पत्य आदिवासींचा अपमान करीत असेल तर याचा तीव्र विरोध करून निषेध नोंदवितो, अशी प्रतिक्रीया आ. राजकुमार पटेल यांनी दिली.