नागपूर मनपा करणार डॉक्टरांची नियुक्ती

    दिनांक :30-Mar-2021
|
नागपूर,
शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत विशेषज्ञ डॉक्टर तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची कंत्राटी पध्दतीने नियुक्ती करण्यात येणार आहे. महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या चर्चेनंतर डॉक्टरांची नियुक्ती करण्याचे ‍निश्चित करण्यात आले आहे.
 
 
mayor_1  H x W: 
 
 
 
मनपातर्फे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत एम.डी. (इंटेन्सिविजिट, फिजिशीयन तसेच एनेस्थेस्टीस्ट) ची विशेषज्ञ म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. सध्याचे प्रचलित मानधनानुसार एम.डी. डॉक्टरांना दोन लाख रूपयापर्यंत मानधन मिळत आहे. परंतु मनपातर्फे ५० हजार रूपये जास्त म्हणजे अडीच लाख रुपये मानधन तसेच एम.बी.बी.एस डॉक्टरांना सध्या ६० हजार रूपये मानधन मिळत आहे. परंतु या पदासाठी मनपातर्फे एक लाख रूपयांपर्यंत मानधन दिला जाणार आहे. डॉक्टरांनी कोरोना बाधितांच्या उपचारात मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.
 
  
शहरात कोरोना रुग्णांची सध्याची परिस्थिती बघता, त्यांना वेळेवर योग्य उपचार मिळण्यासाठी मनपाची वैद्यकीय आरोग्य यंत्रणा सतत कार्यरत आहे. शहरात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये ४०० अतिरिक्त खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी तज्ज्ञ वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. शहरात वाढती रुग्णसंख्या पाहता शासकीय रुग्णालय तसेच मनपाच्या रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता आहे. यासाठी कोव्हिड काळाकरीता मनपातर्फे कंत्राटी पध्दतीने मानधन तत्वावर वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.