नगरपंचायतचे अग्निशमन वाहन जळून खाक

    दिनांक :30-Mar-2021
|
- तिवस्यात धुळवडीच्या दिवशी घटना
तभा वृत्तसेवा
तिवसा,
येथील आनंदवाडी नजीकच्या वनविभागाच्या जागेत लागलेली आग गावात शिरू नये, यासाठी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गेलेल्या तिवसा नगरपंचायतच्या अग्निशमन दलाच्या गाडीलाच 29 मार्चला दुपारी आग लागली आणि हा दुर्दैवी अपघात घडला. मात्र यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र वाहनाचे पूर्णतः नुकसान झाले आहे.

erga_1  H x W:  
 
तिवसा तालुक्यातील व शहरातील आगीच्या 12 घटना या वाहनाने निस्तरल्या होत्या. अजूनही कायमस्वरूपी पदभरती, पत्रव्यवहार करून सुद्धा जिल्हा प्रशासन व नगर विकास शाखेने या वाहनांवर कंत्राटी पद्धतीचे कर्मचारी सुद्धा भरले गेले नाही. एक वर्षांपूर्वीच सदर अग्निशमन वाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर , जिल्हा नियोजन समिती व नगर पंचायत मार्फत प्राप्त झाले होते. तालुक्याच्या ठिकाणी अंत्यत आवश्यक असलेले हे वाहन जळून खाक झाले. तिवसा शहरातील आनंदवाडीनजीक वनविभागाच्या जागेत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गेलेल्या अग्निशमन वाहनालाच आगीत भस्मसात होण्याची जिल्ह्यात ही कदाचित पहिलीच घटना असावी. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिस प्रशासनाने व नगरपंचायत प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली होती. सदर घटनेची चौकशी करण्याची मागणी काही नगरसेवक व नागरिकांनी केली आहे.