ग्राम दक्षता समितीवर रेती उत्खननाची माहिती देण्याची जबाबदारी

    दिनांक :30-Mar-2021
|
बुलडाणा,
जिल्ह्यात अवैध गौणखनिज, रेती उत्खननाचे प्रकार नवे नाहीत. या अवैध गौण खनिज उत्खननाला किंवा रेती तस्करीला चाप लावण्यासाठी गाव पातळीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ग्राम दक्षता समितीकडे देण्यात आली आहे. मात्र, उत्खनन झाले तर समितीतील गावचे सरपंच, पोलिस पाटील यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामूळे सरपंच, पोलिस पाटील यांच्यावर कारवाईची टांगती तलवार लटकली आहे.
 
bul_1  H x W: 0
 
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. राज्य सरकारने 3 जून 2019 रोजी सुधारीत रेती उत्खनन धोरण निश्चित केले आहे. या निर्णयानुसार आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा पातळीवर रेती सनियंत्रण समिती, तालुका पातळीवर रेती सनियंत्रण समिती तर गाव पातळीवर ग्राम दक्षता समिती गठीत करण्यात आल्याचे म्हटले आहे. ग्राम दक्षता समितीमध्ये ग्राम पंचायतीचे सरपंच हे अध्यक्ष आहेत. ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल हे सदस्य आहेत तर तलाठी समीतीचे सदस्य सचीव आहेत. समितीने दर 15 दिवसांनी बैठकीचे आयोजन करून उत्खनन व वाहतूक होत असल्यास त्याला आळा घालण्यासाठी समितीच्या शिफारसीने तहसीलदारांकडे अहवाल सादर करावयाचा आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेल्या परीपत्रकानंतर सरपंच व पोलिस पाटील यांच्यात मोठी खळबळ उडाली आहे. अवैध उत्खनन होत असल्यास त्याबद्दलची माहिती पोलिस पाटील महसूल विभागाला देत असतात. मात्र अनेक गावातील सरपंचासह राजकीय पुढारी अवैध उत्खननात गुंतल्याचे उघड आहे.प्रशासन आणि राजकीय नेते यांच्यातील हितसंबंध सुध्दा सर्वश्रूत आहे. अशा गाव पुढार्‍यांवरच आता अवैध उत्खननाबाबत माहीती देण्याची जबाबदारी आली आहे. भविष्यात अवैध उत्खननास आळा बसतो की नाही? की सरपंचावर कारवाई होते? हे येणारा काळच सांगेल.