श्वानांनाही त्यांचा लागला लळा

    दिनांक :30-Mar-2021
|
- आवाज ऐकताच होतात भोवती गोळा
- मनीष पांगारकर
नेर, 
प्राणिमात्रांवर प्रेम करणे ही आपली भारतीय संस्कृती आहे. आपल्याकडील अनेक सण आणि उत्सवांमध्येसुद्धा प्राणीमात्रांना महत्त्वाचे स्थान आहे. परंतु आधुनिक काळाच्या ओघात माणूस आपल्या अवतीभवती असणार्‍या जगाला विसरून फक्त ‘मी आणि माझा’ एवढाच विचार करायला लागला. पशुपक्षी यांच्याप्रती आपण प्रचंड उदासीन होत चाललो आहोत. परंतु या धकाधकीच्या व भौतिक जगातही प्राणीमात्रांप्रती प्रेम असणारे काही लोक नक्कीच आढळून येतात.
 
yt_1  H x W: 0
 
असाच प्रत्यय नेर येथील प्रतिष्ठित व्यवसायी दिनेश पांगारकर यांच्या बाबतीत आला. निमित्त होते शहराजवळील श्रीक्षेत्र लंकेनाथ येथील नदी प्रवाहात दिवंगत आईच्या रक्षा विसर्जनाचे. नुकतेच त्यांच्या आईचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या निमित्त लंकेनाथ इथे मोजक्या नातेवाईकांसह गेले असता तेथे चिंचेच्या झाडाखाली आठदहा श्वान पहुडले होते. इतरांची दखलही न घेता दिनेश पांगारकर याचा आवाज ऐकताच सर्व श्वान लाडिक साद घालत अचानकपणे त्यांच्याभोवती गोळा झाले असता सोबतच्या मंडळींना आश्चर्याचा धक्काच बसला. एवढ्या दुःखाच्या प्रसंगीही त्यांनी न विसरता त्या श्वानांसाठी बिस्किटे व ब्रेड आणले होते. सर्व श्वान भांडाभांडी न करता आपल्या वाट्याला आलेले खाद्य अगदी आनंदाने खात होते. सोबतच्या मंडळींनी दिनेश यांना त्याबद्दल विचारले असता, मी नेहमीच काही मित्रांसह इथे येतो व यांच्यासाठी खायला आणत असतो. यावेळी मात्र बरेच दिवसात येणे जमले नाही तरी त्यांनी माझी ओळख ठेवली, असे सांगितले. सोबतची सर्व मंडळी मात्र दिनेश पांगारकर यांच्या भूतदयेचे मनापासून कौतुक करत होते आणि श्वानांच्या डोळ्यातील कृतज्ञतेचा भाव सर्वांनाच स्पष्ट जाणवत होता.