चाचण्या कमी, बाधित घटले

    दिनांक :30-Mar-2021
|
- मृत्यूदर कायम, 54 दगावले
- कोरोना बाधित 1156 आढळले
नागपूर, 
रंगपंचमीच्या दिवशी चाचण्याची संख्या कमी झाली. गेल्या 24 तासात 2712 चाचण्या झाल्या. त्यामुळे बाधितांची संख्या 1156 आढळून आली. मात्र, मृत्यूदर अजूनही कायम असून, मंगळवारी तब्बल 54 रुग्ण दगावले.
 
ng_1  H x W: 0
 
शहरासह ग्रामीण भागातील 133 शासकीय-खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या उपचारांची सोय करण्यात आलेली आहे. या रुग्णालयात एकूण 6136 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यत या रुग्णालयातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 79 हजार 904 आहे. तर गृहविलगीकरणात 32 हजार 73 रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण चाचण्या 15 ते 16 हजार व्हायच्या. त्यातून 3 हजारांच्या वर बाधित निघायचे. मात्र, रंगपंचमीच्या दिवशी चाचण्यांची संख्या 15 हजारांवरून 2712 झाली. त्यातूनही बाधित 1156 आढळून आले. मात्र बरे होणार्‍यांचे प्रमाण त्याहून अधिक आहे. आज 1191 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत बरे होणार्‍यांची संख्या 1 लाख 79 हजार 904 आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.62 आहे. बाधितांची संख्या कमी असली तरी मृत्यूची संख्या मात्र कायम आहे. मंगळवारी शहरातील 31 तर ग्रामीणमधील 20 रुग्ण दगावले. जिल्ह्याबाहेरील 3 रुग्णांचा समावेश असल्याने मृत्यूसंख्या 54 आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीणमधील बाधितांसह मृत्यूंची संख्या वाढत असून, हे नागरिकांसाठी धोकादायक आहे.
 
मुखाच्छादन न घालणार्‍यांची संख्या मोठी
मनपाच्या उपद्रव विरोधी शोध पथकाचे जवानांनी मंगळवारी मुखाच्छादन न घालता फिरणा-या बेजबाबदार 80 नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये 500 प्रमाणे 40 हजार रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मुखाच्छादनाचे वाटप करण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी 36805 नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. 1,67,61,500/- चा दंड वसूल केला आहे. मनपा उपद्रव शोध पथक व रेल्वे पोलिस बल यांनी संयुक्तपणे रेल्वे स्थानकावर मुखाच्छादन न घालता फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई सुरु केली. दररोज ही कारवाई केली जात आहे.
8 प्रतिष्ठानांवर कारवाई
नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव विरोधी शोध पथकाने मंगळवारी 8 दूकाने प्रतिष्ठानांनवर कारवाई करुन रु. 45,000 चा दंड वसूल केला. पथकानी 44 प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.