उद्यापासून 45 वर्षावरील व्यक्तीचे लसीकरण

    दिनांक :30-Mar-2021
|
- मनपा आणखी 15 सेंटर वाढविणार
- 1 जानेवारी 1977 पूर्वीचा जन्म असावा
नागपूर,
45 वर्षावरील व्यक्तीचे लसीकरण 1 एप्रिलपासून करण्यात येणार असून, त्यादृष्टीने महानगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे. लसीकरण केंद्राची संख्या आणखी 15 वाढविण्यात येणार असल्याचे मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी सांगितले. शहरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. तसेच रुग्णांच्या मृत्यूसंख्येतही वाढ झालेली आहे. त्यामुळे नागपुरात लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ज्येष्ठ नागरिक आणि विविध आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांचे लसीकरण जोरात सुरू आहे. दरम्यान, तिसर्‍या टप्प्यातील लसीकरण 1 एप्रिलपासून सुरु होणार आहे. यात 45 वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्धांना लस दिली. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात 60 वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण करण्यात आले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तरुणांनाही लस देण्यात यावी अशी मागणी केली जात होती. पण केंद्र सरकारने तिसर्‍या टप्प्यात 45 वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.

ngp_1  H x W: 0 
 
तिसर्‍या टप्प्यातील लसीकरणात 45 वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. यामध्ये व्यक्तीचा जन्म 1 जानेवारी 1977 च्या आधीचा असावा. लस घेण्यासाठी व्यक्तीला आजारी आहे किंवा नाही यासाठीच्या दाखल्याची गरज नाही. याबाबत असलेली अट काढून टाकण्यात आली आहे. कोविन अ‍ॅप रजिस्ट्रेशनची सिस्टिम 45 वर्षांवरील व्यक्तींसाठी 1 एप्रिल 2021 पासून सुरु होईल. लसीचा पुरेसा साठा असून लोकांनी टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही असे डॉ. चिलकर यांनी सांगितले.
 
 
सध्या ज्येष्ठ नागरिक आणि विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या लसीकरणासाठी शहरात 25 लसीकरण केंद्र सुरू आहेत. यात आणखी 15 ची भर पडणार आहे. म्हणजे लसीकरण केंद्राची संख्या 40 होणार आहे. नागरिकांना सोयीच्या केंद्रावर जाऊन लसीकरण करता येईल. केंद्रावर आलेल्यांना सोबत आधार कार्ड आणणे आवश्यक राहील. आनलाईन नोंदणी झालेले आणि नोंदणी न करणार्‍यांनाही लस दिली जाईल. लस घेतल्यानंतर त्याची पावती डिजिटल कॉपी किंवा व्हॅक्सिनेशन सर्टीफिकेटच्या लिंकची मागणी केली पाहिजे. खासगी रुग्णालयांनी लसीच्या किंमतीमध्ये लस प्रमाणपत्रासाठी पैसे आकारले आहेत. त्यामुळे लस घेतल्यानंतर पुढच्या अर्ध्या तासात तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल. तिथून निघण्यापूर्वी लस घेतल्याचे सर्टीफिकेट मागून घ्या. रुग्णालयाने देण्यास नकार दिला तर याची तक्रार मनपाच्या नियंत्रण कक्षाला करा, असेही डॉ. चिलकर यांनी स्पष्ट केले.