लिहा बु.गाव ‘सीसीटीव्ही’च्या दृष्टीक्षेपात

    दिनांक :30-Mar-2021
|
- ग्रा.पं.प्रशासनाने बसविले महाबळेश्वर मंदीरापर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे
मोताळा,
मागील वर्षाच्या घटना पाहता लिहा बु. हे गाव पंचक्रोशीत नव्हे तर तालुक्यात विविध अप्रिय घटनांमुळे चर्चेत आहे. कधी, राजकीय कधी सामाजिक व जातीय तेढ यामुळे काही काळ गावावर या घटनेचा विपरीत परिणाम होवून संबंधीत यंत्रणेवर अनावश्यक ताण वाढत होता. परंतु आता ग्रामपंचायत प्रशासन यांच्या माध्यमातून ग्रा.पं.कार्यालय, बसस्टॅण्ड व जुनाबाजार गल्ली ते महाबळेश्वर मंदीर परिसर व ग्रामपंचायत भवनावर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या दृष्टीक्षेपात असल्याने भविष्यात गावात शांतता निर्माण होण्यास मोठी मदत होणार आहे.

bul_1  H x W: 0 
 
सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यापुर्वी ग्रामपंचायत परिसरात दिवसभर पत्त्याचे खेळांसह आदी धंदे चालत होते. परंतु सीसीटीव्ही कॅमेर्‍यामुळे परिसरातील याचा वापर कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच महापुरुषांच्या पुतळ्याच्या सुरक्षेचा प्रश्न सुध्दा सीसीटीव्हीमुळे मिटला आहे. भविष्यात या परिसरात कोणताही वादविवाद झाल्यास पोलीस प्रशासनाला सीसीटीव्हीत कैद चित्रफितीचा मोठा फायदा होणार असून दारु पिवून उठसूट विनाकारण सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणार्‍या तळीरामांच्या संख्येत सुध्दा घट होईल. सीसीटीव्ही कॅमेर्‍यामुळे भविष्यात गावात शांतता व सामाजिक सलोखा टिकून राहण्यास निश्चित मदत होईल, असा विश्वास लिहा बु.चे शांतताप्रिय नागरीक, नवनियुक्त ग्रा.पं. प्रशासन, पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष यांनी व्यक्त केला आहे.