कला क्षेत्रातील सवलतीच्या गुणांपासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवू नका

    दिनांक :31-Mar-2021
|
- आंदोलनाचा इशारा
वाशीम,  
नियमित अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी गुणपत्रिकेत सवलतीचे गुण देण्याची तरतुद शासनाने केली आहे. मागील वर्षी या तरतुदीची अंमलबजावणी करण्यात आली होती. परंतु यावर्षी शासनाने आपलाच आदेश फिरवून या सवलतीच्या गुणांपासुुन विद्यार्थ्यांना वंचित ठेवले आहे. शासनाच्या या अन्यायकारक धोरणाविरुध्द महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात विभागीय उपाध्यक्ष जगदीश नखाते व जिल्हाध्यक्ष अमोल काळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या 24 नोव्हेंबर 2017 च्या शासन निर्णयानुसार शास्त्रीय कला चित्रकला लोककलेत प्रावीण्य प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांना माध्यमिक परीक्षा 2021 देणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांच्या सुविधे करता ग्रेस गुण देण्यासंदर्भात निर्देशित करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाच्या वतीने एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर चित्रकला क्षेत्रातील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना त्यांच्या सुविधांसाठी अतिरिक्त गुण मिळत आहेत. 

vas_1  H x W: 0 
 
कोरोना संसर्ग संकटामुळे राज्यातील सर्व शाळा बंद असल्यामुळे कला संचालनालयाच्या या दोन्ही परीक्षा घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे यावर्षी जे विद्यार्थी माध्यमिक शालांत परीक्षेला बसले आहेत व ज्यांनी एलिमेंटरी ग्रेड परीक्षा उत्तीर्ण केली आहे असे विद्यार्थी अतिरिक्त गुना पासून वंचित राहू नये म्हणून चित्रकला क्षेत्रातील सुविधेसाठी गुण देण्यात यावे यासाठी महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाने गेल्या चार महिन्यात राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, बच्चू कडू व कला संचालक यांना प्रत्यक्ष भेटून आतापर्यंत दहा निवेदने देण्यात आले आहे. परंतु याबाबत कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही त्यामुळे संपूर्ण राज्यात विद्यार्थी, पालक, कलाशिक्षक, संघटनेचे पदाधिकारी यांनी रोष व्यक्त केला आहे. अतिरिक्त गुण प्राप्त करण्याच्या सुविधेपासून विद्यार्थ्यांना वंचित ठेवणारा उच्च व तांत्रिक शिक्षण विभागाने काढलेला 26 मार्च 2021 रोजीचा सदर आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाच्या वतीने केली आहे.