जन्मजात देशभक्त डॉ. केशव बळीराम हेडगेवार!

    दिनांक :11-Apr-2021
|
डॉ. भालचंद्र माधव हरदास
‘‘केशव अरे केशवा... कुठे आहेस बाळ?’’ सीतारामपंतांचा भारदस्त आवाज महालातील हेडगेवार वाड्यातून ऐकू येत होता. आपले धाकटे बंधू केशव हेडगेवार कुठे दिसत नाहीत म्हणून सीतारामपंत मोठ्याने हाका मारीत होते. वाड्यातील अंधार्‍या खोलीत केशव एकटाच गुडघ्याच्या मध्ये मान घालून गप्प बसला होता. सीतारामपंत केशवास म्हणाले, ‘‘अरे केशवा, किती हाका मारायच्या रे आणि हे काय, इथे एकटाच का उदास बसला आहेस?
 

he_1  H x W: 0  
 
आज तर राणीचा राज्यारोहण दिवस ना! अच्छा! शाळेत मिठाई मिळाली नाही वाटतं केशवला म्हणून राग आला का?’’ झालं..! आतापर्यंत गप्प बसलेला केशव, राणीचे राज्यारोहण आणि मिठाई हे सीतारामपंतांचे शब्द ऐकून लालबुंद झाला आणि म्हणाला, ‘‘दादा, मिळाली ना मिठाई, पण कोण कुठली ती राणी आणि तिचा तो राज्यारोहण दिवस... आपल्या देशाचा संबंध काय तिच्याशी? दादा मला मिठाई तर मिळाली, पण आपल्याला पारतंत्र्यात ठेवणार्‍या जुलुमी ब्रिटिश सत्तेची ती मिठाई मी फेकून दिली.’’ केशवच्या या बाणेदार उत्तरावर सीतारामपंतांचा ऊर भरून आला आणि केशवाला पोटाशी धरून म्हणाले, ‘‘बाळ अभिमान वाटतो तुझा. प्रस्तुत घटना आहे 22 जून 1897 ची आणि अवघा आठ वर्षे वय असलेला हा मिठाई फेकणारा बालक म्हणजेच कालांतराने, ‘होय, मी म्हणतो, हे हिंदुराष्ट्र आहे...!’ असे छातीठोकपणे सांगणारे संघनिर्माता युगपुरुष डॉ. केशव बळीराम हेडगेवार होत.
 
 
 
इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिच्या राज्यारोहणाच्या हीरक जयंतीनिमित्त गावोगावी सभा, संमेलने, आतषबाजी, मेवा-मिठाईचे वाटप आणि स्वाभिमान खुंटीला टांगून केली जाणारी कोरडी भाषणे सुरू होती. विदर्भातल्या नागपूर शहरातदेखील जागोजागी असेच कार्यक्रम झाले. सर्व शाळांमध्ये राणीच्या राज्यारोहण जयंतीनिमित्त मिठाई वाटप करण्यात आले. महालमधील नील सिटी शाळेतदेखील मिठाईचे वाटप झाले, परंतु आपलं भोसल्यांच्या राज्यावर विदेशी युनियन जॅक फडकवणार्‍या या जुलुमी राजवटीच्या राज्यारोहणाचा कसला आनंद? छे! ही मिठाई नसून माझ्या भारतमातेच्या सुपुत्रांनी वर्षानुवर्षे आत्मविस्मृत राहावे यासाठी दिलेले हे विष आहे, असे म्हणून केशव हेडगेवार याने ती मिठाई फेकून दिली आणि त्याच विचारगर्तेत ते तडक घरी आले.
 
 
पुढे असाच प्रसंग 1901 मध्येही घडला. सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणप्रसंगी नागपुरातील एम्प्रेस मिल आणि शासकीय इमारतीवर आतषबाजी बघायला केशवचे सवंगडी सायंकाळी निघाले. केशवालादेखील चलण्याचा आग्रह केला असता आपल्या हिंदुस्थानाला काळोखाच्या गर्तेत ढकलण्यार्‍या साम्राज्यवादी ब्रिटिश सत्तेची रोषणाई बघणे, हा तर शोकदिन आहे, असे उत्तर केशवने दिले.
 
 
1901 मध्ये केशवराव हेडगेवार यांनी राष्ट्रीय घटनांचा परामर्ष आणि युवकांमध्ये क्रांतीची बीजे रोवण्यासाठी देशबंधू समाज या नावाने चर्चामंडळ प्रारंभ केले. जाज्वल्य देशाभिमान कसा असावा, याचे उदाहरण म्हणजे केशव हेडगेवार. अभ्यासाकरिता केशव आणि त्यांचे सवंगडी वझे नावाच्या शिक्षकांच्या घरी एकत्र येत असत. त्यावेळी सीताबर्डी किल्ल्यावर फडकत असलेले युनियन जॅक काढून आपले भोसल्यांचे भगवे निशाण फडकवावे, या उद्देशाने महालमधून सीताबर्डीपर्यंत भुयार खणण्याची योजना केशवने आखली. अर्थात पुढे वझे यांना हे समजल्यावर त्यांनी जरी हे अशक्य असले, तरी देशभक्तीने भारावलेल्या त्या बालसुलभ कल्पनेचे कौतुकच केले. 1907 मध्ये ब्रिटिश राजवटीने विद्यार्थ्यांना राजकीय कार्यक्रमात सहभागी होण्याची बंदी आणि वंदे मातरम् या क्रांतिमंत्राच्या घोषणेवर बंदी घालणारे परिपत्रक जारी केले. ही अन्यायपूर्ण बंदी मोडण्याच्या उद्देशाने केशव हेडगेवार यांनी त्यांच्या नील सिटी विद्यालयात (सध्याचे दादासाहेब धनवटे नगर विद्यालय) एक योजना आखली. ज्यादिवशी इंग्रज अधिकारी शाळेच्या निरीक्षणास आले, तेव्हा योजनेनुसार प्रत्येक वर्गात अधिकार्‍यांचे स्वागत वंदे मातरम् घोषणेने झाले. मात्र या प्रकरणात नागपुरातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आणि दोन महिन्यांनंतर यामागे केशव हेडगेवार आहे, हे निष्पन्न झाल्याने त्यांना नील सिटी विद्यालयातून निलंबित करण्यात आले. निलंबन प्रकारामुळे केशवचे पुढील शिक्षण यवतमाळ येथे विद्यागृह या राष्ट्रीय शाळेत झाले.
 
 
मध्य प्रांतातील बालाघाट येथील रामपायली येथे चुलते आबाजी हेडगेवार यांचेकडे केशव राहायला आले असताना तेथील पोलिस ठाण्यावर बॉम्ब टाकल्याची घटना घडली व त्यात केशवराव सामील असावेत, असे समजून गुप्तचर यंत्रणेचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला. याच ठिकाणी 1908 मधील दसर्‍याच्या सायंकाळी रावण दहन कार्यक्रमात केशवाने इंग्रजी सत्तेविरुद्ध भाषण केले. इंग्रजी सत्तेला सातासमुद्रापार हुसकावून लावणे, हेच खरे सीमोल्लंघन असे भाषण केल्यावर जनसमुदायाने वंदे मातरम्ने रामपायली दणाणून टाकली. यानंतर राजद्रोहाचा आरोप लावून हेडगेवार यांना वर्षभर भाषणबंदी करण्यात आली. वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी केशवराव हेडगेवार यांना कोलकाता येथील नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आले. क्रांतिकारक डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांनी त्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करून दिली. खरं तर मुंबई इलाख्यात वैद्यकीय शिक्षणाची सोय असताना कोलकात्यात जाणे हा देखील योजनेचाच भाग होता. शिक्षणासह अखिल भारतातील क्रांतिकारकांची संयोजन समिती असलेल्या कोलकात्यातील अनुशीलन समितीसोबत संपर्क व संबंध प्रस्थापित करणे हे कार्य हेडगेवार करीत होते. या काळात पुलिनबिहारी दास, त्रैलोक्यनाथ चक्रवर्ती यांचेसह इतर क्रांतिकारकांशी डॉ. हेडगेवार यांचा प्रत्यक्ष संपर्क आला; जो पुढील काळात महत्त्वाचा ठरला. मध्य प्रांत आणि अनुशीलन समिती यामधील महत्त्वाचा दुवा म्हणजे डॉ. हेडगेवार असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरू नये. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून केशव हेडगेवार 1916 मध्ये डॉ. हेडगेवार म्हणून नागपुरात परत आले. डॉ. हेडगेवार यावेळी लोकमान्य टिळकांवर अनन्य श्रद्धा ठेवून काँग्रेसमधे सक्रिय झाले. त्यांना विदर्भ प्रांतिक काँग्रेसचे मंत्री म्हणून जबाबदारी मिळाली. 1920 साली काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन नागपुरात ठरले. त्या अधिवेशनाच्या स्वयंसेवक दलाची संपूर्ण व्यवस्था डॉ. हर्डीकर आणि डॉ. हेडगेवार यांच्याकडे होती. डॉ. हेडगेवार यांनी संपूर्ण प्रांतात प्रवास करून 1200 स्वयंसेवकांचे दल याकामी उभे केले. अधिवेशनात ठेवल्या जाणार्‍या प्रस्ताव समितीतदेखील डॉ. हेडगेवार होते. यावेळी महात्मा गांधी यांच्यासमोर डॉ. हेडगेवार यांनी पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला. मात्र, तो मंजूर व्हायला 1929 चे लाहोर अधिवेशन उजाडावे लागले. प्रांतिक काँग्रेसच्या बैठकीतदेखील डॉ. हेडगेवार आपली मते प्रखरपणे मांडीत असत. अशाच एका बैठकीत सशस्त्र क्रांतिकारकांची निंदा करणारा प्रस्ताव सादर झाला असताना डॉ. हेडगेवार यांचा त्या प्रस्तावास प्रखर विरोध असल्याने तो मागे पडला.
 
 
एव्हाना नागपूर विदर्भ तसेच मध्य प्रांत व वर्‍हाड (सी.पी. अँड बेरार) राज्यातील सर्वच राजकीय, सामाजिक, धार्मिक सभा, संमेलन, संघटना यांत डॉ. हेडगेवारांची उपस्थिती ठरलेलीच असायची. नागपूर नॅशनल युनियन, राष्ट्रीय मंडळ, देशबंधू समाज, भारत व्यायाम शाळा, नागपूर व्यायाम शाळा ही काही प्रातिनिधिक उदाहरणे देता येतील. 1908 आणि 1921 मधील डॉ. हेडगेवार यांच्या जहाल भाषणांना राजद्रोह ठरवून त्यांच्यावर खटला दाखल केला गेला. डॉ. हेडगेवार यांनी कोणताही वकील न घेता स्वतःचा बचाव स्वतःच केला. आपल्या बचावात डॉ. हेडगेवार म्हणतात, कोणत्या कायद्याने इंग्रज लोक माझ्या मायभूमीवर राज्य करीत आहेत? तो कायदा मला दाखवा. ज्यांचे राज्यच मुळी बेकायदेशीर आहे, त्यांचे कायदे, नियम व राज्य मी का म्हणून मानावे? ज्या भाषणामुळे राजद्रोहाचे कलम लावले त्या मूळ भाषणापेक्षा हा बचावाचा युक्तिवाद अधिक ज्वालाग्राही आहे, असे म्हणून या खटल्यात डॉ. हेडगेवार यांना एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली गेली. 19 ऑगस्ट 1921 ते 11 जुलै 1922 पर्यंत डॉक्टर साहेब नागपूरच्या अजनी कारागृहात होते. 12 जुलै 1922 रोजी सुटका झाल्यावर डॉ. हेडगेवार यांच्या अभिनंदनाची सभा नागपूरच्या व्यंकटेश नाट्यगृहात झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी पंडित मोतीलाल नेहरू होते. पूर्ण स्वातंत्र्यासाठी अविरत प्रयत्न आणि साम्राज्यावादापासून विश्वाची मुक्तता हेच व्रत सर्वांनी अंगीकारावे, असे आवाहन डॉ. हेडगेवार यांनी या सभेत केले.
राष्ट्रीय विचारांचे जनमानसांत प्रस्फुटीकरण व्हावे यासाठी डॉ. हेडगेवार सतत प्रयत्नशील असत. त्याच उद्देशाने हिंदी भाषेतील संकल्प हे वार्तापत्र त्यांनी प्रारंभ केले. त्याकाळी बहुतांश पुढारी ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वायत्तता या विचारांच्या आसपास घुटमळत होते, तेव्हा डॉ. हेडगेवार यांनी कुठलीही आडकाठी न ठेवता निर्भेळ आणि विशुद्ध अशा पूर्ण स्वराज्याचीच संकल्पना मांडली होती, हे लक्षात घेतले पाहिजे. पूर्ण स्वातंत्र्य हा स्वदेशी विचार सर्वदूर पोहोचावा यासाठी डॉ. हेडगेवार यांनी स्वातंत्र्य नावाचे दैनिक सुरू केले. चिटणीस पार्कजवळील बेनिगिरीबुवांच्या वाड्यात स्वातंत्र्य दैनिकाचे कार्यालय होते. घरातील आवश्यक कामे आणि सार्वजनिक सभा, संमेलने सोडल्यास डॉ. हेडगेवार उरलेला सर्व काळ बेनिगिरी वाड्यातील या कार्यालयात बसत. हा सर्व खटाटोप सुरू असतानाच आणि अनेक संघटना आणि विचारांची तुलना करताना, राष्ट्रीय विचार शिथिल झाल्याने समाजात अनुशासनहीनता आली आहे व याचे निराकरणासाठी एकच उपाय ते म्हणजे दिग्विजयी राष्ट्राचे पुनरुत्थान व त्यासाठी आसेतु हिमाचल विस्तारलेल्या समाजाचे संघटन स्थापन करणे, या निष्कर्षाप्रत डॉ. हेडगेवार येऊन पोहोचले.
 
 
पुढे 1925 च्या विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर हा सत्य संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. दोन-तीन वर्षात केवळ नागपुरात असलेल्या संघाने विदर्भ आणि पुढे महाराष्ट्रात बाळसे धरले. संघ स्थापनेनंतरही डॉक्टर साहेब 1928 च्या कोलकाता काँग्रेस अधिवेशनात गेले होते. या अधिवेशनानंतर लाहोरच्या सांडर्स या इंग्रज अधिकार्‍याला कंठस्नान घाललेले क्रांतिकारक राजगुरू भूमिगत होण्यासाठी नागपुरात आले, तेव्हा त्यांची नागपूर-विदर्भातील सर्व व्यवस्था डॉ. हेडगेवार यांनीच करून दिली होती. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अगणित अशा अनाम क्रांतिकारकांना संघ आणि संघ संस्थापक मोठे आश्रयस्थान होते. काँग्रेस कमिटीने स्वातंत्र्य हेच आपले ध्येय निश्चित करून 26 जानेवारी 1930 हा स्वातंत्र्य दिन म्हणून सर्वांनी साजरा करावा, असे आवाहन केले; ज्याचे संघाने स्वागत करून त्यादिवशी सर्व शाखांत स्वयंसेवकांच्या सभा भरवून राष्ट्रीय ध्वज भगवा झेंड्याचे वंदन आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार केला म्हणून काँग्रेसचे अभिनंदन करून समारंभ संपन्न करावा, असे संघाने पत्रक काढले होते.
 
 
स्वातंत्र्यलढ्यातील विभूतींना संघाच्या कार्यक्रमात आमंत्रित करून त्यांचे मार्गदर्शन स्वयंसेवकांना आणि समाजाला व्हावे, असा डॉक्टरांचा सदैव प्रयत्न असे. 1928 च्या विजयादशमी उत्सवात सरदार पटेल यांचे बंधू विठ्ठलभाई पटेल आणि 1929 च्या उत्सवात महामना पंडित मदनमोहन मालवीय हे प्रमुख अतिथी होते. देशातील सर्वच क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य संग्रामातील सेनानी यांचा संघावर नेहमीच कृपालोभ असे. इकडे महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने दांडी यात्रा प्रारंभ केली. 6 एप्रिल 1930 रोजी आपल्या सहकार्‍यांसह गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला. सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांचे राष्ट्रीय पातळीवरील या घडामोडींवर बारकाईने लक्ष असे. विदर्भ आणि मध्य प्रांतात मिठागरे नसल्याने जंगल सत्याग्रह करण्याचे निश्चित करण्यात आले. लोकनायक माधवराव अणे यांनी जंगल सत्याग्रहाची रूपरेषा ठरवली. 1930 च्या गुरुपौर्णिमा उत्सवातील भाषणात डॉक्टरांनी जंगल सत्याग्रहात व्यक्तिशः सहभागी होण्याबाबतची त्यांची भूमिका स्पष्टपणे सांगितली. वर्धा, पुलगाव, धामणगाव, पुसद, यवतमाळ अशी ही जंगल सत्याग्रह यात्रा मार्गक्रमण करीत होती. डॉ. हेडगेवार यांच्यासमवेत आप्पाजी जोशी, विठ्ठलराव देव, दादाराव परमार्थ, बाळासाहेब ढवळे, वेखंडे, घरोटे, भय्याजी कुंबलवार, अंबाडे, नारायण देशपांडे, त्रिम्बक देशपांडे, पालेवार आदी मंडळी सहभागी झाली होती. 21 जुलै 1930 रोजी डॉ. हेडगेवार यांच्या नेतृत्वात यवतमाळ येथे धामणगाव मार्गावर लोहारा जंगलात सत्याग्रह सुरू झाला. याठिकाणी डॉ. हेडगेवार व अन्य 11 व्यक्तींना अटक करण्यात आली. यवतमाळ कारागृहातच खटला उभा राहून डॉ. हेडगेवार यांना नऊ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली गेली. सुरुवातीला यवतमाळ व नंतर अकोला कारागृहात त्यांना ठेवण्यात आले. डॉक्टरांनी या कालावधीचा उपयोग विदर्भ व वर्‍हाडात संघकार्य कसे वाढेल, यासाठी करून घेतला. 1931 च्या विजयादशमीला डॉ. हेडगेवार कारागृहात असल्याने त्यांच्या विजयादशमी संदेशाचे गावागावांतील शाखेत वाचन करण्यात आले. या संदेशात डॉक्टर म्हणतात- देशाचे पारतंत्र्य नष्ट होऊन समस्त समाज बलशाली आणि आत्मनिर्भर होत नाही, तोवर हे निजसुखाची अभिलाषा करण्याचा अधिकार आपल्याला नाही. जंगल सत्याग्रहातील झालेला कारावास वेळेआधीच झाल्याने मुक्तता झाली आणि पुनःश्च डॉ. हेडगेवार यांचा झंझावाती प्रवास सुरू झाला.
 
 
21 जून 1940- डॉक्टरांच्या निधनानंतरही संघाच्या स्वयंसेवकांनी विविध राष्ट्रीय आंदोलन आणि अभियानात सक्रिय सहभाग घेतला आहे, हे दिसून येते. 1942 चे चले जाव आंदोलन, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाकिस्तानी आक्रमणाच्यावेळी सैन्यदलाला विविध प्रकारचा सहयोग, गोवा मुक्ती आंदोलन अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. डॉ. हेडगेवार काय किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय, प्रारंभापासूनच प्रसिद्धीपराङ्मुख राहिल्याने आणि श्रेय घेण्याची कोणतीही अहमहमिका नसल्याने संघ आणि संघ संस्थापकांची स्वातंत्र्याच्या राष्ट्रीय आंदोलनातील भूमिका फार प्रसिद्धीस आली नाही. मात्र, आता ब्रिटिश गॅझेट्स, जुनी कागदपत्रे यांचा अभ्यास होत असल्याने त्याकाळी डॉ. हेडगेवार हे प्रत्येक राष्ट्रीय आंदोलनाच्या मागे सर्वशक्तिनिशी उभे ठाकले होते, असे लक्षात येईल. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या प्रारंभी जन्मजात देशभक्त युगपुरुष डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना कोटी कोटी अभिवादन.
9657720242