विनाशाच्या मार्गाने जायचे की...!

    दिनांक :18-Apr-2021
|
- गजानन निमदेव
कोरोना या प्राणघातक विषाणूने गेल्यावर्षीपेक्षाही यंदा मोठे थैमान घातले आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला कवेत घेतले आहे. यंदा महाराष्ट्रातील परिस्थिती जास्त गंभीर झाली आहे. देशात जेवढे रुग्ण दररोज निघतात, त्याच्या सत्तर टक्के एकट्या महाराष्ट्रातील असतात, ही बाब जास्त गंभीर आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा यांसारख्या शहरांमध्ये तर हाहाकार माजला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्ण तर शेजारच्या तेलंगणात उपचारासाठी जात आहेत. नागपुरात ऑक्सिजनचा प्लांट उभारा म्हणून उच्च न्यायालय राज्य सरकारला आदेश देते, एवढे राज्यातले सरकार हतबल झाले आहे. कोरोनाची पहिली लाट काहीशी ओसरल्यानंतर जी ढील आपल्याला मिळाली होती, तिचा गैरफायदा आम्ही घेतला आणि त्यातूनच आता विनाशकारी दुसरी लाट आली आहे. निर्बंध लादल्याशिवाय, हंटर बसल्याशिवाय कुणाचे काहीच ऐकायचे नाही, असा चंगच आम्ही बांधला असल्याने कोरोनाने आमच्याभोवतीचा विळखा आणखी घट्ट केला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
 
corona _1  H x
 
जगातल्या अनेक महासत्ताही हतबल झाल्या आहेत. संपूर्ण जग कोरोनापुढे झुकले आहे, थकले आहे, त्रासले आहे. निसर्गाशी जो खेळ मानवाने चालविला आहे, त्याचाच हा दुष्परिणाम आहे, हे अजूनही आम्ही लक्षात घेणार नसू तर या धरतीवरील मनुष्यजातीचा अंत फार दूर नाही, हे ध्यानात ठेवले पाहिजे. मानवाने निसर्गाशी जो संघर्ष चालविला आहे, तो अतिशय घातक आहे. या खेळात पराभूत कोण होणार हे आता स्पष्ट दिसायला लागले आहे. मानवाने कितीही वैज्ञानिक प्रयोग यशस्वी केले असले आणि कितीही अत्याधुनिक शोध लावले असले, तरी निसर्गाच्या शक्तीला मानव मात देऊ शकत नाही, हे सिद्ध झाले आहे. निसर्ग शक्तीवर मात करता येणे केवळ अशक्य आहे. पण, तरीही मानवाचा संघर्ष सुरूच आहे आणि या संघर्षात मनुष्य चारीमुंड्या चीत होणार, हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ दिसत आहे.
 
 
 
कोरोना विषाणूनं निर्माण केलेलं संकट हे संपले आहे, असे समजूनच आमचे सगळे व्यवहार सुरू झाले होते. पण, आता कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असल्याने सगळीकडे भीतीची, दहशतीची छाया पसरली आहे. संकट अभूतपूर्व आहे. ते कधी संपेल हे आजतरी कुणीच सांगू शकत नाही. या संकटानं अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल. केवळ नागपूर-विदर्भ, महाराष्ट्र आणि भारतच नव्हे, तर जगातल्या अनेक प्रगत देशांमध्येही कोरोनामुळे होणारे मृत्यू पुन्हा वाढले आहेत. ब्राझीलसारख्या देशात तर रस्त्यांलगतच्या फुटपाथवर रुग्णांसाठी बेड टाकले जात आहेत, यावरून संकटाची तीव्रता सहज आपल्या लक्षात यावी. भारतातही दररोज सातआठशे कोरोनाग्रस्त लोक मरताहेत. त्यात तीन-साडेतीनशे लोक महाराष्ट्रातले असतात, यावरून आपल्या राज्यात कोरोना कसा नियंत्रणाबाहेर गेला आणि सर्व उपाय कसे कमकुवत ठरले आहेत, याची कल्पना येईल.
 
कोविड अर्थात कोरोना विषाणूने आणलेल्या या साथरोगाने हे सिद्ध झाले आहे की, मनुष्य आणि निसर्ग यांच्यात ताळमेळ राहिलेला नाही. तो बिघडला आहे आणि त्याला निसर्ग नव्हे, तर मनुष्य जबाबदार आहे. मानवी सभ्यता कायमच भौतिक, आध्यात्मिक आणि मानसिक स्तरावर ठेचकाळत आली आहे, हे लक्षात घेतले तर या ठेचकाळण्यामुळे ज्या जखमा मनुष्याने स्वत:च्या शरीरावर करून घेतल्या आहेत, त्या ब-या करण्यासाठी आधुनिक विज्ञानही अपयशी ठरले आहे. प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञान या जखमा भरून काढण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे दिसते आहे. गेल्या शंभर वर्षांत जी युद्धे झालीत, त्यामुळेही निसर्गाला बाधा पोचली आहे. गेली तीन दशके आम्ही जिहादी हल्लेही सहन करीत आहोत. या धरतीवरील सौहार्दपूर्ण वातावरणही नष्ट झाले आहे. सगळ्या प्रमुख देशांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. त्या लढाईत मानवी सभ्यता पायदळी तुडविल्या जात आहेत, हे लक्षात घ्यायलाही कुणी तयार नाही. आपल्याला दिसत नसलेला कोरोना विषाणू आकाराने फारच सूक्ष्म आहे. या विषाणूने जगाभोवती आपला फास आवळला आहे. हा जीवघेणा विषाणू विस्तारवादी स्वभावाच्या चीनने जगभरात सोडला, असा आरोप अनेक देशांनी केला आहे. स्वत:चा विस्तारवादी स्वभाव जपण्यासाठी चीन कुठल्याही थराला जाऊ शकतो. चीनला जागतिक बाजारपेठ हवी आहे, जागतिक महासत्ता होण्याची घाई झाली आहे. त्यामुळे ड्रगन म्हणून ओळखला जाणारा चीन सातत्याने फूत्कार मारत असतो. पण, ड्रॅगनचा हा फूत्कार जगाला महागात पडला आहे.
 
मानवी इतिहासाचा अभ्यास केला तर आपल्या असे लक्षात येईल की, जगात आजवर ४६ सभ्यता तयार झाल्या, विकसित झाल्या. परंतु, भारतीय सभ्यता अर्थात संस्कृती ही एकमेव अशी आहे, जिचे अस्तित्व अतूट राहिले आहे. हिंदू संस्कृती वगळता अन्य ज्या सभ्यता वा संस्कृती विकसित झाल्यात, त्यापैकी बहुतांश या विलुप्त झाल्यात वा मग त्यांचा स्तर एकदम खाली घसरला. त्या प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करू शकल्या नाहीत. हजारो वर्षांपूर्वी भारतात जे साहित्य होते, ज्या भाषा होत्या, ज्या अवधारणा होत्या, जी नावे प्रचलित होती, जी पवित्र स्थानं होती, ती आजही जशीच्या तशी आहेत. उलटपक्षी त्यात अधिक प्रगती झाल्याचेही आपण पाहतो. अन्य ज्या सभ्यता होत्या, त्यात असे कुठे आढळून येत नाही. हिंदुस्थानात आपली हजारो वर्षे जुनी संस्कृती टिकून राहण्यामागे कारणं आहेत. भारतीय संस्कृती ही राजकारण, अर्थकारण वा स्थानकेंद्रित कधीच नव्हती. त्यामुळेच आज तिचे महत्त्व पूर्वीएवढेच कायम आहे. जागतिक संस्कृतीसाठी वा सभ्यतेसाठी भारतीय संस्कृती ही ज्ञानाचा स्रोत आहे, असे उगाच मानले जात नाही.
 
आजचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे मानले जाते. मानवाने चंद्रावर यान पाठवले, मंगळावर पाठवले. अनेक उपग्रह सोडलेत. पण, वैद्यकीय आघाडीवर लढताना आज मनुष्य जात हतबल झालेली दिसते आहे. कारण, कोरोना नावाचा हा विषाणू मनुष्यनिर्मितच आहे आणि आता त्याच्याशी लढताना निर्माताच थकला आहे. आपण जरी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात जगत असलो, तरी आपली मूळ शक्ती, आपला विवेक हा आपल्या मूळ चेतनेतच आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. बाह्य कौशल्यापेक्षा आंतरिक चेतनेला अधिक महत्त्व आहे आणि म्हणूनच या चेतनेवर आपली अगाढ अशी श्रद्धा असली पाहिजे. आपली ही श्रद्धा कुठेतरी कमी झाल्यानेच आज हे संकट ओढवले आहे, ही बाब मान्य करणारा स्वत:मध्ये सुधारणा करणार असेल तर भविष्यात त्याला अशा संकटाचा सामना करताना अडचणी येणार नाहीत, थकवा येण्याचा तर प्रश्नच नाही.
 
आपल्यात जी आंतरिक देवात्म शक्ती आहे, त्यामुळेच ही चेतनाही जिवंत वास करीत असते, हे लक्षात घेतले आणि तद्नुसार वर्तन ठेवले तर पराभव आसपासही फिरकणार नाही. भारतीय संस्कृतीत आयुर्वेदाला फार महत्त्व आहे. पण, दुर्दैवाने आपणच आयुर्वेद मागे सोडला आहे. आयुर्वेदात जे नियम सांगितले आहेत, ते व्यवस्थित पाळले तर त्याचे सकारात्मक परिणाम आपल्या सहज अनुभवास येतात. याउलट, आधुनिक विज्ञानाने जी औषधं शोधून काढली आहेत, त्यामुळे बॅक्टेरिया तर मरतात, पण त्यामुळे अन्य समस्या निर्माण होतात. मग या समस्या दूर करण्यासाठी अन्य औषधं घ्यावी लागतात. हे एक दुष्टचक्रच आहे. या दुष्टचक्रातून बाहेर निघण्याचा मार्ग भारतीय संस्कृतीत आहे. भारतीय संस्कृतीत आयुर्वेदाएवढेच महत्त्व योग, प्राणायाम यालाही आहे. बाबा रामदेव यांनी योगाचा प्रचार-प्रसार वेगाने केला आहे, त्याचे महत्त्व जगाला पटवून दिले.
 
प्राणायाम करणारे सगळेच कोरोनापासून मुक्ती मिळवू शकतात, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे, जो खरा आहे. परंतु, अजूनही योगाभ्यास करण्यात आम्ही भारतीयही मागे आहोत आणि जगातल्या बहुतांश देशातले लोकही स्वीकार करायला तयार नाहीत. संतुलित आहार-विहार, संतुलित जीवन, संतुलित व्यवहार, चांगल्या सवयी आवश्यक आहेत. शिवाय, निसर्गाचा जो मूळ प्राण आहे, त्याच्याशी स्वत:ला जोडणेही तेवढेच आवश्यक ठरते. निसर्गाशी पुन्हा सामंजस्य प्रस्थापित करणे आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, ही क्षमता योग-आयुर्वेदात आहे, ही एक बाब जरी आपण लक्षात घेतली आणि त्यानुरूप वर्तन ठेवले तर पुढली वाटचाल कठीण निश्चितच नाही. निसर्गाशी ताळमेळ ठेवून व्यवहार करणे, हा एक धडा जरी आपण या संकटातून घेतला तरी पुरेसे आहे. हीच कोरोनाची इष्टापत्तीही ठरेल, यात शंका नाही.