हेल्दी आणि चविष्ट घावन

    दिनांक :21-Apr-2021
|
सध्याच्या कोरोना काळात, हेल्दी डायट हा परवलीचा शब्द झाला आहे. सुपाच्य आणि नव्या चवींसोबत आरोग्यदायी पदार्थ सगळ्यांनाच आवडतात. म्हणूनच चवदार, जाळीदार आणि झटपट तयार होणाऱ्या अस्सल मराठमोळ्या घावनांची  रेसिपी खास तुमच्यासाठी ...

ghawan _1  H x  
 
घावनांसाठी साहित्य :  एक वाटी तांदूळ आणि मीठ
कृती : रात्रभर किंवा किमान आठ तास तांदूळ भिजवून ठेवावे. तांदूळ आपल्या रोजच्या वापरात जे असतील ते घेतले तरी चालतात किंवा सुगंधी तांदूळ घेतल्यास उत्तमच ! तर असा भिजलेला  वाटीभर तांदूळ थोडे पाणी घालून मिक्सरमधून छान  बारीक आणि मऊ वाटून घ्यावा. तयार मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढून घ्यावे. त्यात थोडे मीठ आणि पाणी  घालून मिश्रण एकत्र करून घ्यावे. घावनांचे  मिश्रण सैलसर, सरसरीत ठेवायचे आहे.  नॉनस्टिक तव्यावर थोडंसं  तेल घालून तव्याच्या काठापासून मिश्रण टाकायला सुरुवात करावे. एक मिनिटभर झाकण ठेवून आणि एक मिनिटभर झाकणाशिवाय दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावे. मऊ, लुसलुशीत घावन  तयार आहे. 
चटणीसाठी : जिरं, मीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर/पदिना आणि ताजी कैरी यांची थोडासा गूळ घालून चटणी करा.
तिखट-आंबटगोड चवीच्या या चटणीसोबत किंवा घरच्या नुकत्याच घातलेल्या करकरीत कैरीच्या लोणच्यासोबतही गरमागरम घावन म्हणजे तृप्तीचा आनंद ! 
ही रेसिपी नक्की करून बघा ! अशाच मस्त आणि नाविन्यपूर्ण रेसिपीजसाठी लॉग इन करा tarunbharat.net वर ! धन्यवाद !