'या' खातेधारकांना रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा फायदा

    दिनांक :07-Apr-2021
|
मुंबई,
रिझर्व्ह बँंकेकडून पतधोरण जाहीर करताना मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून, यामुळे देशातील पेमेंट बँका आणि त्यांच्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पेमेंट बँकाकडून डिपॉझिट मर्यादा वाढवण्याची मागणी करण्यात येत होती. आता त्यांची मागणी आरबीआयने मान्य केली आहे. त्यामुळे पेमेंट बँकांना आणि लाखो ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. 

mam _1  H x W:
 
यापूर्वी 1,00,000 रुपयांची मर्यादा होती. आरबीआयने पेमेंट बँक खात्यातील दिवसअखेर शिल्लक मर्यादा 2,00,000 रुपयापर्यंत वाढवली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने ठेवींवरील विमा संरक्षण 5 लाख रुपयांपर्यंत वाढवल्यानंतर पेमेंट बँकांनी खात्यातील शिल्लक मर्यादा वाढवण्याची मागणी केली होती. त्यावर आज आरबीआयने पतधोरण जाहीर करताना हा निर्णय घेतला. त्यामुळे पेमेंट खात्यातील शिलकीची मर्यादा वाढवल्याने लाखो पेमेंट बँक खातेदारांना फायदा होणार आहे. त्यांना आता मोठ्या रकमेचे डिजिटल व्यवहार करणे शक्य होणार आहे. आरबीआयच्या या नव्या निर्णयामुळे पेमेंट बँकांना आता बँकिंग क्षेत्रातील स्पर्धेत समान संधी मिळेल, अशी शक्यता आहे. परवानाधारक पेमेंट बँकांसाठी 27 नोव्हेंबर 2014 रोजी जारी केलेल्या नियमावलीनुसार वैयक्तिक कर्जदाराला त्याच्या बँक खात्यात एक लाख रुपयांची शिल्लक ठेवण्याची परवानगी होती. आता ती दोन लाख रुपये करण्यात आली असल्याचे आरबीआयने आज जाहीर केले.
 
पेटीएम पेमेंट बँक, एअरटेल पेमेंट बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक या आघाडीच्या पेमेंट बँका सध्या कार्यरत आहेत. या बँकांकडून बचत खाते सेवा दिली जाते. ज्यात ग्राहकाला पैसे जमा करण्याची सुविधा आहे. मात्र पेमेंट बँकाकडून कर्ज दिली जात नाही. एटीएम, डेबिट कार्ड पेमेंट बँक देत असतात, मात्र क्रेडिट कार्ड देत नाहीत. ज्या ठिकाणी बँकिंग सेवा पोहोचली नाही अशा ठिकाणी पेमेंट बँकांना सेवा देण्यास परवानगी देण्यात आली आहे.