देशात कोरोनाची भीषण लाट

    दिनांक :07-Apr-2021
|
- 1.15 लाखांवर नव्या बाधितांची भर
नवी दिल्ली,
देशात कोरोनाची भीषण लाट आली असून, मागील वर्षीच्या तुलनेत ती अधिकच भयानक ठरली आहे. कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असताना, मागील चोवीस तासांत आढळून आलेल्या नव्या बाधितांची संख्या चिंता वाढविणारी ठरली आहे. मंगळवारी एकाच दिवशी 1 लाख 15 हजार 736 बाधितांची भर पडली आहे.

nat _1  H x W:  
 
देशातील कोरोनाबाधितांनी एक लाखाचा टप्पा पार करण्याची तीन दिवसांतील ही दुसरी वेळ आहे. या नव्या लाटेमुळे देशातील एकूण संक्रमितांचा आकडा 1 कोटी 28 लाख 1 हजार 785 च्या घरात गेली आहे. देशात जे नवे बाधित आढळून आले, त्यात एकट्या महाराष्ट्रातील 55,469 जणांचा समावेश आहे. याच काळात 59,856 लोक कोरोनातून मुक्तही झाले असून, यात राज्यातील 34,256 जण आहेत. तर देशभरात झालेल्या 630 मृत्युंमध्ये राज्यातील 297 जणांचा समावेश आहे. देशात कोरोनाने आतापर्यंत 1 लाख 66 हजार 177 जणांचा बळी घेतला असून, कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या 1 कोटी 17 लाख 92 हजार 135 झाली आहे. मृत्यूचे प्रमाण 1.30 टक्के आणि बरे होण्याचे प्रमाण 92.11 टक्के आहे.
 
 
नव्या बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होण्याचा आजचा 28 वा दिवस आहे. नव्या बाधितांचे वाढते प्रमाण आणि कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या कमी यामुळे देशातील सक्रिय बाधितांची संख्याही वाढली आहे. देशभरात सध्या 8 लाख 43 हजार 473 सक्रिय बाधित असून, हे प्रमाण आणखी वाढत 6.59 टक्क्यांवर गेले आहे. 12 फेबु्रवारी रोजी रोजी देशात केवळ 1,32,926 सक्रिय बाधित होते.